गुजरातमधून विक्रीसाठी आणलेली पाऊणे नऊ लाखांची दारू जप्त; भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 09:48 PM2022-05-27T21:48:41+5:302022-05-27T21:49:27+5:30
गुजरात येथून मक्का पोहे घेऊन आलेल्या टेम्पोतुन दमण बनावटीची दारू विक्री करीता घेऊन आलेल्या टेम्पोवर अंजुरफाटा मनीसुरत कंपाऊंड येथे कारवाई करीत ८ लाख ७४ हजार २०० रुपयांची इंग्लिश दारूसह ट्रक जप्त केला आहे.
नितिन पंडीत
भिवंडी-
गुजरात येथून मक्का पोहे घेऊन आलेल्या टेम्पोतुन दमण बनावटीची दारू विक्री करीता घेऊन आलेल्या टेम्पोवर अंजुरफाटा मनीसुरत कंपाऊंड येथे कारवाई करीत ८ लाख ७४ हजार २०० रुपयांची इंग्लिश दारूसह ट्रक जप्त केला आहे. सदरची कारवाई भिवंडी गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभाग भिवंडी यांच्या संयुक्त पथकाने केली असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
भिवंडी गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार लक्ष्मण व्हदलुरे,नरसिंग क्षीरसागर यांना गुप्त बातमीदारा मार्फत गुजरात येथून मक्का पोहे हे बॉक्स घेऊन निघालेल्या टेम्पो मधून दमण येथे विक्रीसाठी बनविलेली इंग्लिश दारू तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली असता.त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, प्रफुल्ल जाधव,पो उपनिरी रमेश शिंगे, पथकातील रामसिंग चव्हाण,हनुमंत वाघमारे,रवींद्र पाटील, जानुसिंग पवार, राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, मंगेश शिर्के, अरुण पाटील, सुनील साळुंखे,सचिन जाधव,साबीर शेख, रंगनाथ पाटील, भावेश घरत, रोशन जाधव, प्रशांत बर्वे, रवींद्र साळुंखे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मनोज निकम, शिपाई संजय तडवी, संजय भोसले या संयुक्त पथकाने भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मनीसुरत कंपाऊंड येथे पाळत ठेवून त्या ठिकाणी आलेल्या टेम्पोची टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये मक्का पोहेच्या बॉक्स मागे दमण बनावटीच्या मकडॉल, डीएसपी, ब्लेंडर, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टेक, डीएसपी ब्लॅक,एमपायर ब्ल्यू या ब्रँड च्या दारूच्या १९४४ बाटल्या असलेले १०२ बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी सदर ८ लाख ७४ हजार २०० रुपयांची विक्री साठी अवैधरित्या आणलेली इंग्लिश दारू व ट्रक असा एकूण १६ लाख ८२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत रब्बी अहमद मोहम्मद रफी शेख व अविनाश अर्जुन घाडीगांवकर दोघे रा. मुंबई यांना अटक करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.