भिवंडीत फसवणुकीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेचा यश
By नितीन पंडित | Published: June 6, 2023 07:59 PM2023-06-06T19:59:09+5:302023-06-06T19:59:26+5:30
आरोपींकडून ४ लाख रुपये हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेने सोमवारी दिली आहे.
- नितीन पंडित
भिवंडी : पैसे दीडपट करून देण्याचे अमिष दाखवून बारा लाखांची फसवणूक केल्याची घटना भिवंडीत २९ मे रोजी घडली होती. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानांतर्गत ३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा करत होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले असून आरोपींकडून ४ लाख रुपये हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेने सोमवारी दिली आहे.
संतोष उर्फ बाळू मोहन गायकवाड वय ४० वर्ष, मलीनाथ उर्फ मल्लेश श्रीमंत डिंगी वय ४५ वर्ष, व रोहित सतीश मोरे वय २९ वर्ष तिघेही राहणार पद्मा नगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या तिघांनीही आपसात संगणमत करून कोकणातील सावंतवाडी येथील रहिवाशी हेमंत कृष्णा नाईक यांचे परिचयाचे विनायक धुरी व कोल्हापूर येथील प्रकाश लिंगायत यांना पैसे डबल करून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून १२ लाख रुपये घेऊन गेले होते. मात्र कोणत्याही प्रकारे रकमेचा परतावा न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लाख रुपये हस्तगत केले असून या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, धनराज केदार, प्रफुल्ल जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, पोलीस हवालदार साबीर शेख, सुनील साळुंखे, रंगनाथ पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव पोलीस कॉन्स्टेबल, भावेश घरत, महिला पोलीस हवालदार माया डोंगरे, श्रेया खताळ यांनी केला असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.