रोहिणी खडसे यांच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 05:42 PM2021-12-28T17:42:35+5:302021-12-28T17:45:24+5:30
Rohini Khadse attack : मुक्ताईनगर: शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चौघांचा समावेश
मुक्ताईनगर : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर सोमवारी २७ रोजी रात्री हल्ला झाला होता. या प्रकरणात शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चार अनोळखी व्यक्ती अशा सात जणांविरुद्ध मंगळवारी २८ रोजी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शिवसेना विधान सभाक्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई आणि चांगदेव ग्रा.पं. सदस्य पंकज कोळी यांचा समावेश आहे.
जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालिका रोहिणी खडसे -खेवलकर यांनी याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सोमवारी रात्री चांगदेव येथील हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास मानेगाव फाट्या पासून अर्ध्या किमी अंतरावर त्यांच्या कारसमोर तीन मोटरसायकल आडव्या झाल्या आणि रास्ता अडविला. यावेळी गाडीच्या प्रकाशात चेहरे दिसून आले, त्यात सुनील पाटील याने वाहनांच्या डाव्याबाजूने येऊन माझ्याकडे पिस्तूल रोखले. चांगदेव ग्रा.पं. सदस्य पंकज कोळी याच्या हातात तलवार होती तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून लॉक असल्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी गाडीवर हल्ला चढविला. यात गाडीची काच फुटली. अंधारात त्यांच्या सोबतचे अन्य चार अनोळखी आरोपीही या हल्ल्यात सामील होते, असे फिर्यादीत नमूद आहे. जास्त वेळ न दवडता हल्लेखोरांनी पळ काढला होता.
या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात भादवि ३०७, ३४१, ४२७, १४१, १४३, १४७,१४८,१४९ आर्म ॲक्ट २५(३),२५(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.
मी घाबरणार नाही- रोहिणी खडसे
प्राणघातक हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती माध्यमांसमोर कथन केली. मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहिल. बोदवड नगरपंचायती पासून सुरू असलेल्या राजकीय वैमनस्यातूनच शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी हा हल्ला केल्याचे त्या म्हणाल्या.
हा कुठला शिवसेनेचा आमदार - एकनाथ खडसे
आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर खडसेनी जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, हा कुठला शिवसेनेचा आमदार... शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि रवींद्र पाटील यांच्या त्यागाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर हा निवडून आला. एकीकडे म्हणतो मी सेनेचा जिल्हा प्रमुख आणि दुसरी कडे म्हणतो मी अपक्ष आमदार ज्यांच्या बळावर आमदार निवडून आला आता त्यांनाचं छळतोय. भाजप आणि सेना युती असतांना गद्दारी करून अपक्ष निवडून आला आहे.
भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध - चंद्रकांत पाटील
दरम्यान सोमवारी रात्री झालेल्या या प्राण घातक हल्ल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. हा भ्याड हल्ला असल्याचे सांगत मुक्ताईनगरच्या पावन परंपरेला यामुळे गालबोट लागले असून याचा आपण तीव्र निषेध करत असल्याचे निवेदन त्यांनी जारी केले आहे. तर या हल्ल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण विधानसभेत करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
सखोल तपास सुरू - पोलीस अधीक्षक मुंडे
रोहिणी खडसे यांनी दिलेल्या फिर्याद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेली तीन नावे शिवसेना पक्षाशी निगडित आहे ही बाब सर्व श्रुत आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली.