सायरनवरून लागला गुन्ह्याचा छडा; महिलांना अश्लील फोन करणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 03:41 PM2019-08-30T15:41:48+5:302019-08-30T15:45:19+5:30
सायरनवरून लागला छडा : गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : महिलांना फोन करून त्यांच्यासोबत अश्लील संभाषण तसेच मॅसेज करणाऱ्याला पोलिसांनीअटक केली आहे. एका महिलासोबत तो बोलत असताना रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज आला होता. त्याद्वारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
संतोष देवासी (३२) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो नेरुळ सेक्टर २० चा राहणारा आहे. त्याच्याविरोधात वाशी, एनआरआय तसेच रबाळे पोलिसठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संतोष हा महिलांचे नंबर मिळवून त्यांना फोन करून अश्लील संभाषण करायचा. तसेच अश्लील मॅसेज देखील वापरायचा. मात्र याकरिता तो स्वतंत्र सिमकार्डचा वापर करायचा. यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर वाशीतील एका महिलेला तो जेव्हा फोन करायचा तेव्हा रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज यायचा. सदर महिलेने याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार या गुन्ह्याच्या तपासाकरिता गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, उपनिरीक्षक राणी काळे यांचे पथक तयार केले होते. त्यांनीच तांत्रिक तपासातून संतोष देवासी याची माहिती मिळवली. चौकशी दरम्यान तो नेरुळच्या अपोलो रुग्णालयात रुग्णवाहिकेवर मदतनीस म्हणून कामाला असल्याचे समोर आले. तर रुग्णवाहिकेवर कार्यरत असतानाच तो रुग्णालयातील महिला रुग्ण तसेच महिला कर्मचारी यांचे मोबाईल नंबर मिळवायचा. यानंतर त्यांना वेगळ्या नंबरवरून फोन करून अश्लील संभाषण करायचा. यावेळी रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज लक्षात घेऊन वाशीतील तक्रारदार महिलेने पोलिसांना माहिती दिली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, चौकशीत त्याने अनेक महिलांना असे फोन करून त्रास दिलेला असल्याचे उघड झाले. त्याकरिता वापरलेले सिमकार्ड देखील पोलिसांनी जप्त केले आहे.