‘त्या’ दागिन्यांवर मावस बहिणीचाच डल्ला; चपलेवरून लागला सुगावा, २४ तासात गुन्ह्याची उकल
By प्रशांत माने | Published: January 16, 2023 03:33 PM2023-01-16T15:33:51+5:302023-01-16T15:41:02+5:30
मानपाडा पोलिसांनी या गुन्हयाचा छडा २४ तासात लावला असून प्रिया यांच्या मावस बहिणीनेच या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे तपासात उघड झाले आहे.
डोंबिवली - लोढा पलावा येथील क्र्ला बिल्डींगमध्ये प्रिया सक्सेना यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक उघडून त्यावाटे घरात प्रवेश करून अज्ञात व्यक्तीने २० लाख रूपये किमतीचे ४० तोळे दागिने चोरून नेल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी ५.३० ते शुक्रवारी रात्रौ ११.३० च्या दरम्यान घडली होती. दरम्यान मानपाडा पोलिसांनी या गुन्हयाचा छडा २४ तासात लावला असून प्रिया यांच्या मावस बहिणीनेच या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे तपासात उघड झाले आहे. सिमरन पाटील (वय २७) रा. कामोठे नवी मुंबई असे आरोपी महिलेचे नाव आहे.
सिमरन ही गेले १५ दिवस प्रिया यांच्याकडे वास्तव्याला होती. शुक्रवारी दोघी नवी मुंबईतील कामोठे येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी सिमरन हिने प्रिया यांच्या पर्समधील घराची चावी आणि इमारतीत प्रवेश करण्यासाठी लागणारे कार्ड असे काढून घेतले आणि प्रिया यांची नजर चुकवून सिमरन रिक्षाने लोढा पलावा येथील घरी आली. चावीने दरवाजाचे लॉक उघडले घरातील कपाटातील सोन्याचे दागिने चोरले आणि पुन्हा दरवाजा बंद करून ती पुन्हा कामोठे येथील कार्यक्रमात पोहोचली. चाव्या पुन्हा पर्समध्ये ठेवण्याचा तिचा डाव होता. मात्र तत्पुर्वी आपल्या पर्समधून चाव्या आणि कार्ड गायब असल्याचे प्रियाच्या निदर्शनास पडले आणि तिने थेट आपले घर गाठले पण दरवाजा कुलुपबंद होता. लॉक तोडून प्रिया यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरातून दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. गुन्हयाच्या तपासकामी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे आणि सुनिल तारमळे यांचे पथक नेमले होते.
सिमरन रिक्षातून लोढा पलावा येथे आली. तिला कोणी ओळखू नये यासाठी सिमरन हिने तिच्या अंगावरील ड्रेसवर वन पीस परिधान केला तसेच तोंडाला स्कार्फ लावला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये आपला चेहरा दिसणार नाही याची तिने दक्षता घेतली होती. परंतू तिच्या चप्पलने घात केला आणि त्यावरून ती घरात येऊन गेल्याचे स्पष्ट झाले. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. सिमरन काही दिवस प्रिया यांच्या घरी रहायला आली होती. तेव्हा तिने घराची रेकी केली होती आणि दागिने चोरण्याचा प्लॅन रचला होता. तो यशस्वी देखील झाला पण तिच्याच चपलांमुळे तो उघडा पडला.