Crime: आदित्य ठाकरेंच्या नावाने पैशांची मागणी, क्रीडापटूची केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 11:02 AM2022-08-29T11:02:41+5:302022-08-29T11:03:06+5:30
Crime News: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरून वरळीतील एका क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दादर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : पोलीस आयुक्तांचे नाव आणि फोटो यांचा आधार घेत व्हॉट्सॲपचा वापर करून पोलीस अधिकाऱ्यांचा फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरून वरळीतील एका क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दादर पोलीस अधिक तपास करत आहेत.
वरळी कोळीवाड्यातील रहिवासी आणि कुस्तीपटू दीपेश जांभळे यांना २३ ऑगस्ट रोजी व्हॉट्सॲपवर संदेश आला. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने प्रोफाइल फोटो म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो ठेवला होता. या आरोपीने जांभळे यांना संदेश पाठवून पैशांची मागणी केली. आपल्याला एका मित्राला तातडीने २५ हजार रुपये ट्रान्सफर करायचे आहेत. मात्र, नेटबँकिंग काम करत नसल्याने तातडीने २५ हजार रुपये पाठवण्याची विनंती हॅकरने केली. जांभळे यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली.