Crime: ड्रग्जची अमेरिकावारी रोखली, धुळे येथून मुंबईला रवाना केलेले कोट्यवधींचे ड्रग्ज एनसीबीने केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:21 AM2022-11-17T09:21:27+5:302022-11-17T09:21:53+5:30
Crime News: धुळे ते मुंबई अन् मुंबई ते अमेरिकेला निघालेले जवळपास एक कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे.
मुंबई : धुळे ते मुंबई अन् मुंबई ते अमेरिकेला निघालेले जवळपास एक कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे. आठवडाभरात त्यांनी ही कारवाई केली आहे. आरोपींकडून ट्राॅमाडाॅलच्या एक किलो वजनाच्या ३ हजार ८४० गोळ्या, एनट्राझेपामच्या १०.०८ किलो वजनाच्या १३ हजार ५०० गोळ्या, उच्च प्रतीचा १९ किलो गांजा, ०१ हजार १५० हायड्रोपोनिक विड जप्त करत ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत ड्रग्ज तस्करीतील प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
एनीसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आठवडाभर मोहीम राबविली. एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेटने मुंबईहून यूएसएला कुरिअर पार्सलद्वारे ट्राॅमाडॉल गोळ्यांची अवैध तस्करी करण्याची योजना आखली असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने मुंबईतील एका कुरिअर कार्यालयावर १० नोव्हेंबरला छापेमारी करून ट्राॅमाडाॅलच्या गोळ्या जप्त केल्या.
पुढे एनसीबीने धुळ्याहून मुंबईला ड्रग्ज वाहतूक करण्याचा कट रचणाऱ्या आंतरराज्यीय गांजा तस्करांचा पर्दाफाश केला. पथकाने ११ नोव्हेंबरला मुंबईतील एका बस स्थानकाभोवती सापळा रचून वाहक बसखाली उतरताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या सामानाच्या झडतीमध्ये एनसीबीला १९ किलो वजनाचा उच्च प्रतीचा गांजा सापडला. आंध्र प्रदेश-ओडिशा येथून हा गांजा तस्करी करून आणण्यात आला होता. एनसीबीने अटक केलेले दोन्ही वाहक हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय आहेत.
एनसीबीला उच्च दर्जाच्या हायड्रोपोनिक वीडची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटची माहिती मिळाली.
दोहा, कतार येथे कुरिअरद्वारे ही ड्रग्ज तस्करी करण्यात येणार होती. आंतरराष्ट्रीय शिपमेंट अपलोड होण्याच्या मार्गावर असतानाच तपासणीसाठी थांबविण्यात आली.
१४ नोव्हेंबरला एनसीबीने केलेल्या या कारवाईत त्यांना धार्मिक संदर्भ असलेल्या फोटो डेकोरेशन फ्रेम्समध्ये लपविलेला ०१.१५० किलो उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजाही जप्त करण्यात यश आले.
एनसीबीने १५ नोव्हेंबरला या नायट्राझेपम गोळ्यांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या प्रमुखासह प्राप्तकर्त्याला मुंबईतून अटक केली.
दुचाकीवरून या गोळ्या
आणून देताच एनसीबीने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. या दोघांजवळून एनसीबीने १०.०८ किलो वजनाच्या १३ हजार ५०० गोळ्या जप्त केल्या आहेत. तर, या दोघांच्या चाैकशीतून आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. त्यानुसार, अटक केलेल्या आरोपींकडे अधिक तपास सुरू आहे.