ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करताना फसविल्याने गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 01:52 AM2021-01-31T01:52:31+5:302021-01-31T01:52:49+5:30
Crime News : मोबाइल बॅलन्स संपला असे सांगून दिल्लीतील एका तरुणाने मोबाइल लावण्यासाठी फोन मागून ऑनलाइन ६० हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती.
नवीन पनवेल - मोबाइल बॅलन्स संपला असे सांगून दिल्लीतील एका तरुणाने मोबाइल लावण्यासाठी फोन मागून ऑनलाइन ६० हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांनंतर दिल्ली येथील राहणाऱ्या या आरोपीला पुण्यातील हवेली तालुक्यातील वाघोली गावातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संजयरावत हे पनवेल शहरातील मिडलक्लास हाउसिंग सोसायटीत रस्त्यावर उभे होते, यावेळी विजय सिंग, (२५, रा. सुरतपूर गाव, जि. अलीगड, दिल्ली) याने बॅलन्स संपला आहे असे सांगून संजयकडे मोबाइल मागितला. संजय यांनी मोबाइल दिला, मात्र त्याचा आरोपीने गैरफायदा घेऊन त्यांच्या फोनमधून गुगल पेद्वारे २० हजार रुपयांचे तीनवेळा ट्रान्झेक्शन करून तब्बल ६० हजार रुपयांची रक्कम आपल्या स्वतःच्या खात्यात वर्ग करून फसवणूक केली. त्यानंतर तब्बल ८ ते ९ दिवसांनंतर संजय त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली.