मेहुण्याने घातला कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 04:41 AM2018-07-14T04:41:26+5:302018-07-14T04:41:42+5:30
वयाच्या ५०व्या वर्षी व्यावसायिकाने एका विवाहित महिलेशी लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांतच कर्ज न फेडल्याने मेहुण्याच्या घरावर जप्तीचे आदेश आले.
मुंंबई - वयाच्या ५०व्या वर्षी व्यावसायिकाने एका विवाहित महिलेशी लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांतच कर्ज न फेडल्याने मेहुण्याच्या घरावर जप्तीचे आदेश आले. मेहुण्याने ते घर विकत घेण्याचा सल्ला व्यापाऱ्याला दिला. व्यापाºयानेही पत्नीचाच भाऊ असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून पुढाकार घेतला. मात्र, याच विश्वासात त्यांची पावणेतीन कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी मेहुण्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मालाड परिसरात व्यावसायिक राजेंद्र ठक्कर (५१) राहण्यास आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांनी लीनासोबत विवाह केला. लीना यांना पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. ते दोघेही ठक्कर यांच्यासोबत राहतात.
मालाड परिसरातच लीना यांचा भाऊ तेजस जितेंद्र राजा व त्याची पत्नी जागृती राजा राहण्यास आहे. लग्नानंतर दोघांची घरी ये-जा सुरू झाली. त्याचा विदेशातून खेळणी आयात निर्यातीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायासाठी त्याने बँकेकडून २०१५ मध्ये अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात घर गहाण ठेवले. मात्र, व्यवसायात तोटा झाल्याने त्याने कर्ज घेतल्यापासून एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे त्याच्या घरावर बँकेने जप्तीचे आदेश काढले.
दोघांनी मदतीसाठी ठक्कर यांच्याकडे धाव घेतली. त्यांना याबाबत सांगून पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिला. तेजसने त्यांना तो फ्लॅट विकत घेण्यास सांगितले. तो विकत घेतल्यास त्याचा ताबा तुमच्याकडे राहील आणि बदनामी होणार नाही. ठक्कर यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि फ्लॅट विकत घेण्यासाठी तयारी दर्शविली.
त्यांनी बँकेत विचारणा केली, तेव्हा तेजस यांना बँकेने ३ कोटी ३० लाख रुपयांचा हप्ता भरणे बाकी असल्याचे सांगितले. मात्र, २ कोटी ६५ लाखांत फ्लॅट बँकेकडून विकत घेऊ शकतो, असे सांगून तेवढे पैसे भरण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी डिसेंबर २०१७ पासून २८ मार्चपर्यंत २ कोटी ७९ लाख रुपये भरले. करारानुसार, घराचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरित १४ लाख आणि घर ठक्कर यांच्या नावावर करण्यात येईल, असे मेहुण्याने सांगितले होते. मात्र, त्याने घराचा ताबा न देता शिवीगाळ करत हकलून लावले.
अखेर यामध्ये आपली फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मालाड पोलिसांनी मेहुण्यांसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक केली नसल्याची माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडीस यांनी दिली.
बँकेचे थकविले होते कर्ज
व्यवसायासाठी मेहुण्याने अडीच कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, एकही हप्ता न भरल्याने बँकेने घरावर जप्तीचे आदेश काढले.
त्याने भावोजींना आपले घर विकत घेण्यास सांगितले. ठक्कर यांनीही विश्वास
ठेवत घर विकत घेण्यासाठी तयारी दर्शविली होती.