शेअर्समध्ये जास्त पैशांच्या आमिषाने गुंतवणूक केलेल्या १२५ जणांची २ कोटी ६५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 09:24 AM2022-07-17T09:24:08+5:302022-07-17T09:25:35+5:30
Crime News : निवृत्त एसटी कर्मचाऱ्याने १० लाख रुपये स्वतःचे आणि नंतर पत्नी, २ मुली व जावई यांचे मिळून एकूण ८३ लाख रुपये गुंतवले.
मीरारोड - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या स्कीममध्ये जास्त पैशांच्या आमिषाने गुंतवणूक करणाऱ्या सुमारे १२५ गुंतवणूकदारांची २ कोटी ६५ लाखांना फसवणूक झाल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे .
भाईंदर पश्चिमेस सालासर क्लासिकमध्ये राहणारे अण्णा अमृते यांची कारवी स्टॉक ब्रोकिंग नावाने राम मंदिर मार्गावरील विनायक इमारतीत कार्यालय आहे. तर त्यांच्यासोबत भागीदार म्हणून काम करणारा कुलदीप रुंगटा हा भाईंदर पूर्वेच्या इंद्रप्रस्थ या आलिशान संकुलात राहतो. शेअर बाजारात पैसे गुंतवणुकीच्या बदल्यात प्रति १ लाखास दरमहा ५ टक्के प्रमाणे ५ हजार तसेच ६ महिन्यांनी आणखी आकर्षक परतावा अशी योजना सुरू होती.
मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळत असल्याने २०१८ सालापासून फिर्यादी नारायण नीलवे ( ६९ ) रा. सेजलपार्क, घरटन पाडा, दहिसर या निवृत्त एसटी कर्मचाऱ्याने १० लाख रुपये स्वतःचे आणि नंतर पत्नी, २ मुली व जावई यांचे मिळून एकूण ८३ लाख रुपये गुंतवले. त्याच्या विविध कंपन्यांच्या पावत्या नीलवे यांना अमृते यांनी दिल्या अनेक महिने नीलवे यांना स्कीमप्रमाणे अमृते यांनी पैसे देखील दिले.
परंतु काही महिन्यांपासून त्यांच्यासह अन्य काही गुंतवणूकदार असलेले बाळासाहेब जाधव, रवींद्र देसाई, रुतेश सुर्वे, दीपक अग्रवाल संकेत दळवी, सुशांत जाधव, दीपक पिल्ले, विनायक गुरव, सागर झंझुर्णे आदींसह सुमारे १०० ते १२५ जणांकडून गुंतवणुकीचे पैसे घेऊन देखील मोबदला मिळत नसल्याचे नीलवे यांना आढळून आल्यानंतर १४ जुलै रोजी त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन अमृते व रुंगठा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून फसवणुकीची रक्कम जास्त असल्याने सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. लोकांकडून गोळा केलेल्या पैशातून कुलदीप रुंगठा याने आलिशान फ्लॅट खरेदीपासून लग्नासाठी मोठी रक्कम खर्च केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.