भयंकर! 6 मुलांच्या आईवर एकतर्फी प्रेमातून रस्त्यात चाकूने वार; थरारक घटनेचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 02:55 PM2022-05-28T14:55:03+5:302022-05-28T14:56:58+5:30
Crime News : महिलेने एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या तरुणाशी लग्न करण्यास नकार दिला होता, हे ऐकून तरुण आणखीन बिथरला. महिलेचा पाठलाग करत त्याने शुक्रवारी भरदिवसा तिच्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केलं.
हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सहा मुलांची आई असलेल्य़ा एका महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने हल्ला केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. शुक्रवारी रस्त्याच्या मधोमध तरुणाने महिलेवर वार केले आहेत. IANS या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातली माहिती दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
महिलेने एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या तरुणाशी लग्न करण्यास नकार दिला होता, हे ऐकून तरुण आणखीन बिथरला. महिलेचा पाठलाग करत त्याने शुक्रवारी भरदिवसा तिच्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केलं. जुने शहरातील हाफिज बाबा नगर येथील वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर 48 वर्षीय महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या व्यक्तीच्या शोधात पोलीस व्यस्त आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कंचनबाग पोलीस ठाण्याच्या निरीक्षक उमा महेश्वरा राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज बाबा नगरमध्ये एका व्यक्तीने एका महिलेवर अनेक वेळा चाकूने वार करताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या महिलेने त्या व्यक्तीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने हा हल्ला करण्यात आला. आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सध्या धोक्याबाहेर असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण बुरखा घालून महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे, अचानक तो महिलेवर मागून लांब चाकूने हल्ला करताना दिसत आहे. महिला जखमी होऊन खाली पडल्यानंतरही तो थांबत नाही आणि एका व्यक्तीने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने त्याच्यावरही चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला.
जखमी महिला ही सहा मुलांची आई असून, तिचा शेजारी अनेक वर्षांपासून तिला त्रास देत होता आणि तिच्या मागे लागला होता, असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. गेल्या वर्षी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी त्याला अटक करून नंतर सोडून दिल्याचे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.