सैराटची पुनरावृत्ती! मुलीने प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या पित्याने कुटुंबातील 7 जणांना जिवंत जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:31 PM2021-10-19T12:31:20+5:302021-10-19T12:36:55+5:30
Crime News : मुलीने आपल्या मर्जीने लग्न केल्यामुळे नाराज झालेल्या एका पित्याने रागाच्या भरात कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. मुलीने आपल्या मर्जीने लग्न केल्यामुळे नाराज झालेल्या एका पित्याने रागाच्या भरात कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याच्या दोन मुली आणि चार नातवंडांसह त्याच्या कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळलं. मुलीच्या प्रेमविवाहाला आरोपीचा विरोध होता आणि त्या रागातून त्याने हे भयंकर कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच यामध्ये केवळ आरोपीचा जावई बचावला असून इतर सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मंजूर हुसैन असं आरोपीचं नाव आहे. त्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुझफ्फरगड जिल्ह्यात राहणाऱ्या मुलीच्या घराला आग लावली. या घरात त्याच्या मुली फौजिया बीबी आणि खुर्शीद आपल्या कुटुंबीयांसह राहत होत्या. या आगीत फौजिया बीबी आणि खुर्शीद यांच्यासह त्यांचे पती आणि दोघींची चार लहान मुलं यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मेहबूब अहमद आणि बीबीने 2020 मध्ये प्रेमविवाह केला होता
बीबीचे पती मेहबूब अहमद घरी नसल्याने या घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. त्यांनी सासरे मंजूर हुसैन आणि त्यांचा मुलगा साबीर हुसैन यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. "मी कामानिमित्त मुल्तानमध्ये होतो. जेव्हा मी घरी परतलो तेव्हा घराला आग लागलेली पाहिली. यावेळी मला मंजूर हुसैन आणि साबीर हुसैन हे दोघंही घटनास्थळावरून पळून जाताना दिसले" असं मेहबूब अहमद यांनी पोलिसांना सांगितलं आहे. तसेच मेहबूब अहमद आणि बीबीने 2020 मध्ये प्रेमविवाह केला होता.
सासरे लग्नामुळे खूश नव्हते
आपल्या विवाहाला सासरे मंजूर हुसैन यांचा विरोध होता. सासरे लग्नामुळे खूश नव्हते. त्यातूनच त्यांनी घराला आग लावली. या घटनेत मेहमूद अहमद यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकारी अब्दुल मजीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही घटना प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबांमधील शत्रुत्वाचा परिणाम म्हणून घडली आहे. आम्ही दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे". पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.