Crime News: माणगाव तालुक्यातून ८ गावठी बॉम्ब हस्तगत, करंजवाडी आदिवासीवाडीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 09:02 AM2022-06-21T09:02:13+5:302022-06-21T09:03:22+5:30
Crime News: रानात, जंगलात प्राण्याची शिकार करण्यासाठी बनविलेले आठ गावठी बॉम्ब रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने हस्तगत केले आहेत. माणगाव तालुक्यातील पाणसई-करंजवाडी आदिवासीवाडी येथून एकाच्या घराच्या अंगणातून हे बॉम्ब हस्तगत केले आहेत.
अलिबाग : रानात, जंगलात प्राण्याची शिकार करण्यासाठी बनविलेले आठ गावठी बॉम्ब रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने हस्तगत केले आहेत. माणगाव तालुक्यातील पाणसई-करंजवाडी आदिवासीवाडी येथून एकाच्या घराच्या अंगणातून हे बॉम्ब हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेले गावठी बॉम्ब हे जिवंत असून सुरक्षेसाठी इंदापूर येथील एका कॉरीवर मॅगजिनमध्ये ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
माणगाव तालुक्यात पाणसई करंजवाडी येथे आदिवासी वाडीवर एका घरात जिवंत गावठी बॉम्ब असल्याची खबर रायगड बॉम्ब शोधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार पाणसई करंजवाडी आदिवासी वाडीवर माहिती घेऊन पथकाने सापळा रचला. पहाटे साडेचार ते पाच दरम्यान खबऱ्याने दिलेल्या माहिती ठिकाणी पथकाने छापा टाकला. यावेळी आरोपीच्या घराच्या परिसरात पथकाने शोध घेतला असता आंब्याच्या झाडाखाली खड्डा खणून एका प्लास्टिक बरणीत आठ जिवंत गावठी बॉम्ब ठेवलेले सापडले. याप्रकरणी पोलिसांनी माणगाव येथील बाबू जाधव व राम वाघमारे राहणार विळा आ.वाडी यांना अटक केली आहे.
गेल्या वर्षी स्फोटात एकाचा मृत्यू
बॉम्ब पथकाने हस्तगत केलेले गावठी बॉम्ब हे इंदापूर येथील एका कॉरीवर सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहेत. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. जंगलात, रानात प्राण्याची शिकार करण्यासाठी तसेच नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गावठी बॉम्बचा वापर केला जातो. तर बॉम्ब बनविताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
‘ब्रुनो’श्वानाची
महत्त्वाची भूमिका
बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने केलेल्या कारवाईबाबत माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अजून काही ठिकाणी गावठी बॉम्ब असल्याची माहिती पथकाकडे मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत ‘ब्रुनो’ या श्वानानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.