Crime News: सावकारी जाचानेच गेले ९ जणांचे बळी, सांगलीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणात १५ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:00 PM2022-06-22T12:00:00+5:302022-06-22T12:00:57+5:30
Crime News: डाॅ. माणिक वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ जणांना अटक केली आहे. वनमोरे बंधूंनी सावकारांकडून मोठे कर्ज घेतले होते.
सांगली : डाॅ. माणिक वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ जणांना अटक केली आहे. वनमोरे बंधूंनी सावकारांकडून मोठे कर्ज घेतले होते. त्यातून वारंवार होणारा अपमान, पैशासाठी तगादा यामुळे वनमोरे कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक केलेल्यांमध्ये नंदकुमार पवार (५२), राजेंद्र बन्ने (५०), अनिल बन्ने (३५), खंडेराव शिंदे (३७), डाॅ. तात्यासाहेब चौगुले, रेखा चौगुले (४५), शैलेश धुमाळ (५६), संजय बागडी (५१), अनिल बोराडे (४८), शिवाजी कोरे (६५), विजय सुतार (५५), पांडुरग घोरपडे (५६), प्रकाश पवार (४५) यासह १५ जणांचा समावेश आहे. फरार १२ जणांचा शोध सुरू आहे.
दिली होती जीवे मारण्याची धमकी
पोलीस अधीक्षक गेडाम म्हणाले की, वनमोरे कुटुंबाने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशाची परतफेड करण्यात त्यांना अडचणी येत होत्या. सावकारांकडून कुटुंबीयांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गावातील चौकात अडवून वारंवार अपमान करण्यात येत होता. मिरज शासकीय रुग्णालयात नऊ जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल राखून ठेवला आहे.
काय आहे दोन चिठ्ठ्यांमध्ये?
डाॅ. माणिक वनमोरे व त्यांचे बंधू पोपट वनमोरे यांच्या घरात प्रत्येकी एक चिठ्ठी सापडली आहे. खासगी लोकांकडून कर्जाने पैसे घेतले असून, त्याची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत. हे कर्ज व्यापारासाठी घेतले होते, असा उल्लेख त्यात आहे; पण किती रक्कम घेतली होती, याचा उल्लेख नाही.
अटक केलेल्यांमध्ये सावकार, डाॅक्टर, शिक्षक
- अटक केलेल्यांमध्ये डाॅक्टर, शिक्षक, एसटी वाहकाचा समावेश आहे. तात्यासाहेब चौगुले वैद्यकीय डाॅक्टर, अनिल बोराडे शिक्षक, संजय बागडी एसटी वाहक आहे.
- नंदकुमार पवार याचे बेकरी दुकान, तर शैलेश धुमाळ याचा हाॅटेलचा व्यवसाय आहे. प्रकाश पवारचे स्टेशनरी दुकान
आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शैलेशव आशिष धुमाळ या सावकारांचा समावेश आहे. दोघांवर याआधी हद्दपारीची कारवाई झाली होती.