मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरला चार लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 12:36 PM2021-08-04T12:36:32+5:302021-08-04T12:36:57+5:30
Crime News: मेहुण्याला वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली जे.जे. रुग्णालयातील ४३ वर्षीय भूलतज्ज्ञ डॉक्टरची चार लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.
मुंबई : मेहुण्याला वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली जे.जे. रुग्णालयातील ४३ वर्षीय भूलतज्ज्ञ डॉक्टरची चार लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार हे जे.जे. रुग्णालयाच्या वसाहतीत राहतात. महामारीत जीटी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तेथे एका खासगी संस्थेच्या मनीष मारुती साळसकर (४५) सोबत ओळख झाली. तेव्हा त्यांनी बीड येथे राहणाऱ्या मेहुण्याच्या वैद्यकीय प्रवेशासाठी साळसकरकडे विचारणा केली. तेव्हा त्याने जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी चार लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून पैसे भरले. पुढे संबंधित महाविद्यालयाची प्रवेशाची मुदत संपल्यानंतरही प्रवेश न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्याने दिलेले धनादेशही वठले नाहीत. पुढे साळसकरकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागल्याने त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
मनीष साळसकरकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागल्याने डॉक्टरना संशय आला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.