Crime News : बनावट धनादेशाद्वारे खातेधारकांचे पैसे वळते, टोळीला अटक; विरार, मानपाडा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 09:27 AM2022-02-02T09:27:54+5:302022-02-02T09:28:30+5:30
Crime News : बनावट धनादेश तयार करून खातेधारकांचे पैसे वापरणाऱ्या टोळीला विरार व मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रविवारी विरार, नालासोपारा परिसरातून अटक केली आहे.
नालासोपारा/डोंबिवली : बनावट धनादेश तयार करून खातेधारकांचे पैसे वापरणाऱ्या टोळीला विरार व मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून रविवारी विरार, नालासोपारा परिसरातून अटक केली आहे.
इंडस् टॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीचा २४ कोटी रुपयांचा बनावट धनादेश तयार करून तो बँकेत सादर केला होता. विशेष म्हणजे यावर असणाऱ्या सह्या या देखील तंतोतंत जुळत असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस
ठाण्यात १ ऑक्टोबर २०२१ ला वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याप्रकरणी मानपाड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, पोलीस शिपाई विनोद ढाकणे आणि विरारचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे, पोलीस शिपाई दीपक जगदाळे यांच्या टीमने कारवाई केली. त्यांनी रविवारी विरार आणि नालासोपारा शहरातून सचिन प्रकाश साळस्कर (२९), उमर फारूक (३९), अनेक ओतारी (३३) या तिघांना पकडले असून ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत मजहर खान (४०), हरिश्चंद्र कडव, नितीन शेलार (४०) आणि अशोक चौधरी (५१) यांना अटक करण्यात आली होती. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.
डमी अकाउंटचाच वापर
- ही टोळी खातेधारकांचे बँक डिटेल्स
गोळा करणे, त्यावर असणारे बॅलन्स, खातेधारकाच्या सहीचे फोटो वगैरे माहिती गोळा करतात. त्यानंतर या माहितीच्या आधारे बनावट धनादेश बनवण्याचे काम करते.
- एक साधा धनादेश घेऊन त्यावरील खाते नंबर खोडून, नवीन खाते नंबर प्रिंट करायचे. मग बनावट सही करायचे. नंतर हा धनादेश वापरून अकाउंट टू अकाउंट पैसे पाठवायचे.
- पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील डमी अकाउंटचाच वापर करायचे अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. या टोळीने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त बनावट धनादेश बनविल्याचेही उघड झाले आहे.