Crime News: अभिनेते अन्नू कपूर यांना लाखोंचा गंडा, गोल्डन अवरमुळे पैसे मिळाले परत, ओशिवरा पोलिसांची कारवाई
By गौरी टेंबकर | Published: October 1, 2022 02:54 PM2022-10-01T14:54:53+5:302022-10-01T15:06:38+5:30
Crime News: फिल्म अभिनेते अन्नू कपूर (६६) यांची ऑनलाईन फसवणूकीची करत त्यांना ३ लाख ८ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला होता. मात्र त्यांनी याप्रकरणी त्वरित (गोल्डन अवर) मध्ये ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांनी रक्कम परत मिळवण्यात पोलिसाना यश आले
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: फिल्म अभिनेते अन्नू कपूर (६६) यांची ऑनलाईन फसवणूकीची करत त्यांना ३ लाख ८ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला होता. मात्र त्यांनी याप्रकरणी त्वरित (गोल्डन अवर) मध्ये ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांनी रक्कम परत मिळवण्यात पोलिसाना यश आले.
ओशिवरा पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विंडर मेअर इमारतीत कपूर राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एच एस बी सी बँकेत त्यांचे खाते आहे. त्यांना २९ सप्टेंबर रोजी ८२४९२५३८३२ या क्रमांकावरून कॉल आला. कॉलरने त्याचे नाव कृष्णकुमार रेड्डी असे सांगून तो एचएसबीसी बँकेच्या हेड ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगत तक्रारदार यांना त्यांच्या एचएसबीसी बँक खात्याचे केवायसी करणे बाकी असल्याचे सांगितले. तसेच केवायसी केली नाही तर तुमचे बँक खाते बंद होईल अशी भीतीही दाखवली. त्यामुळे कपूर यांनी केवायसी करण्याकरिता काय करावे लागेल असे विचारले. तेव्हा कॉलर रेड्डी याने तक्रारदारना त्यांच्या बँकेचे खाते क्रमांक व त्यांच्या मोबाईलवर येणारे ओटीपी क्रमांक द्यावे लागेल असे सांगितले. त्यांना बोलण्यात गुंतवत त्यांचं विश्वास संपादन करून त्यांच्याकडून त्यांच्या एचएसबीसी बँकेचे खाते क्रमांक व मोबाईलवर प्राप्त झालेले ओटीपी प्राप्त केले आणि कपूर यांना त्यांच्या बँकेचे केवायसी झाल्याचे सांगितले.
त्यानंतर काही वेळात तक्रारदार यांना त्यांच्या मोबाईलवर एचएसबीसी बँकेचे कस्टमर केअर वरून कॉल आला व त्यांनी त्यांचे खाते कॉम्प्रोमाइज झाले असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यातून २ लाख आणि २ लाख ३६ हजार रुपये काढण्यात आल्याचे सांगत त्यांचे खाते बंद केले. तेव्हा कपूर यांना त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समजले. ते फसवणूक झाल्याबाबतची तक्रार घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्यास गेले. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात कलम ४१९, ४२० आणि आय टी कायद्याच्या कलम ६६(सी) (d) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांच्या मार्गद्शनाखाली पोलीस निरीक्षक सकुंडे व पोलीस उपनिरिक्षक कुरकुटे आणि पथक यांनी तात्काळ प्राप्त माहितीच्या आधारे एचएसबीसी बँकेच्या मॅनेजरशी संपर्क करून झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. ज्यात फसवणूक करून काढलेली रक्कम ही कॅनरा व युनियन बँकेच्या खात्यामध्ये वळते झाल्याचे त्यांना समजले. त्यानुसार सदर दोन बँक खाती फ्रीज करत अद्याप ३ लाख ८ हजार रुपये पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत.