बापरे! अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नावाने लाखोंची फसवणूक; जाणून घ्या, काय आहे 'हे' प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 04:58 PM2022-06-05T16:58:07+5:302022-06-05T17:00:19+5:30
Crime News : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Actor Sushant Singh Rajput) नावाने लाखोंची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - नोएडामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Actor Sushant Singh Rajput) नावाने लाखोंची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सुशांतच्या मृत्यूवर चित्रपट बनवण्याच्या बहाण्याने तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलच्या मालकाने नोएडा सेक्टर 39 पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर-39 मधील हे प्रकरण आहे. जिथे काही लोकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नावावर चित्रपट बनवण्याच्या नावाखाली हॉटेल बुक केलं आणि जवळपास एक वर्ष ते त्याच हॉटेलमध्ये राहिले. मात्र भाडं देताना त्यांनी हॉटेल मालकाची फसवणूक केली. नंतर त्यांनी चेक दिला पण तो बाऊन्स झाला. या प्रकरणी हॉटेलच्या मालकाने नोएडा सेक्टर 39 पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे,
नोएडा सेक्टर 39 पोलीस स्टेशनचे प्रभारी राजीव बालियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण खूप जुनं आहे, मात्र आता 3 जून रोजी हॉटेल मालक मंगलम तिवारी यांनी याबाबत तक्रार केली आहे. हॉटेल मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली की 2020 मध्ये त्याच्या हॉटेलमध्ये 4 लोक आले. विजय शेखर, नितीन पंत, सचिन तिवारी आणि वरुण खंडेलवाल अशी त्या चौघांची नावं आहेत. त्यांनी हॉटेलमध्ये सांगितलं की ते सर्व डायरेक्टर आहेत आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह यांच्या मृत्यूवर ते मिळून चित्रपट बनवणार आहेत.
सचिन तिवारी नावाची व्यक्ती या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका साकारणार होता. त्यानंतर ते हॉटेलमध्ये राहू लागले. त्या चौघांनी चार रुम बुक केल्या होत्या. ते लोक जवळपास एक वर्ष हॉटेलमध्ये राहिले पण त्यांनी त्याचे भाडे भरले नाही. या घटनेनंतर मालकाने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली, त्यावर न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.