Crime News : पान खावून पिचकारी मारली, युवकाने कापड विक्रेत्यावर थेट गोळीच झाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:36 PM2021-11-01T20:36:30+5:302021-11-01T20:37:11+5:30
सराय ओपी पोलीस ठाणेच्या हद्दीतील जुन्या किला पोखरी येथील ही घटना असून रविवारी रात्री उशिरा घडली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती
बिहारच्या सीवान जिल्ह्यात केवळ पान खावून अंगावर थुंकल्याच्या रागातून युवकाने कापड व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या केली. येथील व्यापाऱ्याने पान खाऊन खिडकीतून बाहेर पिचकारी मारली होती. त्यावेळी, बाहेर उभा असलेल्या तरुणाच्या अंगावर ती पिचकारी पडली. त्याचा राग मनात धरुन युवकाने व्यापाऱ्याच्या दुकानात शिरकाव करत शाब्दीक बाचाबाची सुरू केली. मात्र, दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर युवकाने थेट व्यापाऱ्याच्या अंगावर गोळी झाडली. त्यामध्ये, व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
सराय ओपी पोलीस ठाणेच्या हद्दीतील जुन्या किला पोखरी येथील ही घटना असून रविवारी रात्री उशिरा घडली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. तर, दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत व्यक्तीचे नाव एससान मलिक असून उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील शाहगाजीपुरा येथील रहिवाशी असलेल्या नवाब हसन यांचे ते सुपुत्र होते.
एहसान हा सिवान येथे एका भाड्याच्या घरात आपल्या सहकाऱ्यांसोबत राहात होता, तो फेरी करुन कपडे विकत होता. रविवारी रात्री तो घरात जेवण बनविण्याचं काम करत असताना पान चघळत होता. त्याचवेळी खिडकीतून थुंकल्यानंतर काही भाग खाली उभारलेल्या युवकाच्या अंगावर पडला. त्यामुळे युवकाने संताप व्यक्त करत एहसानला शिवीगाळ केली. एहसानने त्या विरोध केल्यामुळे संतप्त युवकाने थेट बंदुकीतून गोळी झाडली. एहसानच्या मित्रांनी त्यास रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 18 वर्षीय आरोपी गोलू मियाँ आणि त्याचे वडिल जावेद मियाँ यांना अटक केली आहे.
दरम्यान, सिवान जिल्ह्यात 8 तासांत गोळीबारातून 2 हत्या झाल्या आहेत. तर, गेल्या 48 तासांतील ही चौथी घटना आहे.