भयंकर! तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, दोन गट भिडले; पोलिसांवर दगडफेक अन् गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 12:49 PM2021-11-15T12:49:44+5:302021-11-15T12:58:46+5:30
Crime News : एक वर्षापूर्वी तरुणीचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर आता तिचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
नवी दिल्ली - देशामध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आग्राच्या शाहगंज पोलीस ठाणे परिसरातील चिल्ली पाडामध्ये ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांवर लोकांनी दगडफेक आणि गोळीबार केला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर दोन गट आपापसात भिडले आहेत. गावामध्ये गोंधळ निर्माण झाला असून तणावाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी तरुणीचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर आता तिचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
तरुणीच्या मृत्यूची माहिती मिळताच दोन गटांमध्ये मोठा वाद झाला. हाणामारी झाली. यानंतर पोलिसांवर देखील दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. तसेच भाजपाचे काही नेते देखील घटनास्थळी दाखल झाले. वर्षभरापूर्वी वर्षाने अरमान नावाच्या एका मुलासोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर आता तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर तरुणीचा पती फरार झाला आहे. दगडफेक आणि गोळीबार झाल्यानंतर भाजपाचे नेते प्रताप सिंह चौहान आणि योगेंद्र उपाध्याय हे पोलीस ठाण्यात दाखल झाले.
वर्षभरापूर्वीच झाला होता प्रेमविवाह अन् आता आढळला मृतदेह
भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात घोषणाबाजी केली. तसेच अरमान आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आग्राचे एसएसपी सुधीर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा मृतदेह हा संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. ज्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार केला आहे. त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.