महिन्याला 5 हजार पगार घेणारा पालिकेचा माजी कर्मचारी झाला 238 कोटींचा मालक? काय आहे 'हे' प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:32 AM2022-03-04T08:32:35+5:302022-03-04T08:42:09+5:30
Crime News : एका माजी आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला अवघा पाच हजार रुपये पगार मिळत होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत तो तब्बल 238 कोटींचा मालक झाला आहे.
नवी दिल्ली - आग्रा महानगरपालिकेच्या एका माजी आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला अवघा पाच हजार रुपये पगार मिळत होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत तो तब्बल 238 कोटींचा मालक झाला आहे. महिन्याला 5 हजार रुपये कमावणाऱ्या पालिकेच्या माजी कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. कर्मचाऱ्याच्या विरोधात अनेकदा अधिकाऱ्यांनीही तक्रार केली आहे. मात्र कारवाईच्या फाईल धुळीत कुठेतरी कोपऱ्यात पडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सपोर्ट इंडिया सोसायटीचे अध्यक्ष आणि आग्राचे अधिवक्ता सुरेश चंद सोनी यांनी हा आरोप केला आहे.
पालिकेचे माजी कर्मचारी राकेश वसंल सिकंदरामधील राधा नगर कॉलनीचे रहिवासी आहेत. ते साधारण 2008 मध्ये पालिकेच्या आऊटसोर्सिंग कर्मचारीच्या रुपात लागले होते. त्यांना महिन्याला पाच हजार रुपये पगार होता. जेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं तेव्हा त्यांचा पगार 19 हजार रुपये होता. मात्र पालिकेत काम करीत असताना राकेश बंसल यांनी आतापर्यंत कोट्यवधी संपत्ती मिळवली आहे असं म्हटलं आहे. तसेच अधिवक्ता सुरेश चंद सोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये पालिकेचा आऊटसोर्सिंग कर्मचारी राकेश बंसल याच्या नावावर कोट्यवधी संपत्ती आहे.
भ्रष्टाचाराबाबत अनेकदा शासनापर्यंत तक्रारी
कर्मचाऱ्याविरोधात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र कारवाईच्या फाईलवर कोणीच पुढील चौकशी केली नाही. फाईल तशाच धूळ खात पडल्या आहेत. त्या कर्मचाऱ्याविरोधात कोणीही कारवाई करू नये अशी त्याने सेटिंग्ज केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. आग्र्यासह शेजारी जिल्ह्यांमध्ये त्याची संपत्ती असून अनेक लग्जरी गाड्याही आहेत. राकेश बंसल हे 2008 मध्ये पालिकेच्या आऊटसोर्गिंगवर तैनात झाले होते. 2020 पर्यंत राकेश बंसल पालिकेच्या नगरायुक्तांच्या वैयक्तिक सहाय्यक पदावर होते, मात्र सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप लागल्यानंतर त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आलं. यासोबतच राकेश बंसल याच्या भ्रष्टाचाराबाबत अनेकदा शासनापर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत.
10 फ्लॅट, नोएडामध्ये मॉल, 3 गाड्या, रायफल आणि अन्य संपत्ती
आरोपीजवळ दहाहून अधिक फ्लॅट, नोएडामध्ये मॉल, तीन गाड्या, रायफल आणि अन्य संपत्ती आहे. सुरेश चंद सोनी यांनी सांगितलं की, राकेश बंसल याने पत्नी, आई, भाऊ यांच्यानावावर अनेक प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. त्याने आग्र्यात कोट्यवधींची जमिनदेखील खरेदी केली आहे. राकेश बंसल याचे वडील चाटची गाडी चालवायचे. त्यात कशी बशी राकेशला पालिकेत नोकरी लागली. पार्किंग आणि जाहिरात आपल्या आवडत्या वा ओळखीच्या लोकांना देऊ लागले. यातून कमिशन ठरविण्यात आलं. यादरम्यान त्यांनी कोट्यवधी पैसे कमावले. इतकच नाही तर हॉटेल आणि रेस्टॉरंट संचालकांकडूनही अवैध वसुली केली. राकेश बंसल यांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना अनेकदा काढण्यात आलं, मात्र सेटिंग्ज लावून ती पुन्हा रुजू होत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.