Crime News: सांगली जिल्ह्यातील तब्बल ५० घरफोड्या उघडकीस, टोळी जेरबंद, चौघांना अटक, साडेपंधरा लाखांचा माल हस्तगत
By शरद जाधव | Published: August 16, 2022 11:12 PM2022-08-16T23:12:15+5:302022-08-16T23:12:46+5:30
Crime News: सांगली : जिल्ह्यातील विविध भागांतील बंद घरे फोडून ऐवज लांबवणाऱ्या चौघांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून जिल्हाभरात तब्बल ५० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
- शरद जाधव
सांगली : जिल्ह्यातील विविध भागांतील बंद घरे फोडून ऐवज लांबवणाऱ्या चौघांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून जिल्हाभरात तब्बल ५० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, १५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मोबाईल भैरू पवार (वय १९), इकबाल भैरू पवार (४०, दोघेही रा. करंजवडे ता. वाळवा), घायल सरपंच्या काळे (४६, रा. चिकुर्डे ता. वाळवा) व प्रवीण राजा शिंदे (३१, रा. गणेशवाडी ता. खटाव, जि. सातारा) अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत.
जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या घरफोडी व अन्य चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एलसीबीने पथक तयार केले आहे. या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार कारंदवाडीतील जलस्वराज्य प्रकल्पावर छापा मारुन दोन संशयितांना ताब्यात घेतले तर अन्य दोघांना करंजवडे व गणेशवाडी येथून ताब्यात घेतले. या टोळीने जिल्ह्यातील तब्बल ५० घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. या टोळीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भगवान पालवे, दीपक गायकवाड, सुनील चौधरी, सुधीर गोरे, नीलेश कदम, हेमंत ओमासे, आर्यन देशिंगकर, शुभांगी मुळीक आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
एलसीबीने कारवाई केलेेले सर्व संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. इकबाल पवार याच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात खुनाच्या प्रयत्नाचा व आष्टा पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद आहे, तर प्रवीण शिंदे याच्यावर पुसेगाव येथे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.