Crime News: शेजाऱ्यांचा काटा काढण्यासाठी रचला हत्येचा कट, पण डाव उलटला आणि हातात पडल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 03:01 PM2021-11-13T15:01:09+5:302021-11-13T15:01:52+5:30
Crime News: जमिनीच्या वादातमधून शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी एका महिलेने तिच्याच बहिणीच्या सासऱ्याची हत्या करण्याचा कट आखला. तसेच त्यामध्ये तिने तिची आई, भाऊ यांच्याबरोबरच तिच्या पतीलाही सभागी करून घेतले.
देहराडून - जमिनीच्या वादातमधून शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी एका महिलेने तिच्याच बहिणीच्या सासऱ्याची हत्या करण्याचा कट आखला. तसेच त्यामध्ये तिने तिची आई, भाऊ यांच्याबरोबरच तिच्या पतीलाही सभागी करून घेतले. या कटांतर्गत तिने आई आणि भावासोबतच बहीण आणि तिच्या पतीलाही सहभागी करून घेतले. बहिणीच्या सासऱ्याला बोलावण्यात आले. तसेच भाड्याच्या मारेकऱ्यांकडून त्याची हत्याही करण्यात आली. त्यानंतर सरपंचासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांना हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद दिसल्याने त्यांनी अधिक पडताळणी केली, त्यामधून या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणी मुख्य आरोपीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
नानकमत्ताच्या ध्यानपूर गावामध्ये ९ नोव्हेंबर रोजी रात्री सुनेच्या घरी आलेल्या जगीर सिंह यांची घरातील अंगणामध्ये झोपले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रजविंदर आणि मोठी बहीण लविंद्र हिने गावातील सरपंच समर सिंह, बलविंद्र, लखविंदर, द्वारिका, सुंदर, जिंतेंद्र आणि धर्मेंद्र यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता. समजले की, हा गुन्हा घडला तेव्हा. सर्व आरोपी आपापल्या घरामध्ये होते. तेव्हा पोलिसांनी तक्रारकर्त्यांचीच उलट तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य कारस्थानकर्ती लविंद्र, तिची आई गुरदीप, भाऊ सूरज, बहीण राजविंदर, जावई कुलवंत आणि शूटर जसवंत सिंह यांना अटक केली.
या हत्येसाठी आरोपींनी जसवंत सिंह यांना ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यामधील १५ हजार रुपये अॅडव्हान्समध्ये दिले गेले. तसेच उर्वरित रक्कम ही काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. मात्र हा सर्व डाव उलटला. पोलिसांनी १२ बोअरची बंदूकीसह अॅडव्हानमध्ये सुपारीसाठी दिलेली रक्कम जप्त केली.
या हत्याकांडामध्ये मृताचा मुलगा कुलवंत हासुद्धा सहभागी होता. एका कारस्थानांतर्गत ८ दिवसांपूर्वी कुलवंत याने त्याचे वडील जागीर यांना सासरवाडीस नेऊन सोडले होते. जागीर यांना मद्यपानाचे व्यसन होते. त्याचदरम्यान, हे हत्याकांड घडले त्या रात्री त्यांना दारू पाजण्यात आली, तसेच त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी लविंद्र हिचा शेजाऱ्यांसोबत जमिनीचा वाद होता. गेल्या महिन्यामध्ये शेजाऱ्यांनी वादावरून लविंद्र आणि तिच्या शेजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे शेजाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी लविंद्र यांनी कारस्थान रचले, तसेच स्वत: यामध्ये अडकून कुटुंबीयांसह गजाआड गेली आहे.