Crime News: सहकारी शिक्षिकेला बोटाने इशारा केला; शिक्षकाला भर मिटिंगमध्ये जाब विचारताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:48 PM2022-05-05T14:48:25+5:302022-05-05T14:48:45+5:30
शिक्षकाकडून तिला सतत धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी केली जात आहे.
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात लैंगिक छळाची घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षिकेने तिच्या सहकारी शिक्षकावर गंभीर आरोप केला आहे. तिने याबाबत संबंधीत शाळेच्या प्रशासनाला लिखित तक्रार दिली आहे. आरोपी शिक्षक प्रकरण मिटविण्यासाठी धमकी देत आहे. यामुळे ती घाबरलेली आहे.
सरकारी शाळा असल्याने शिक्षिकेने विभागिय कार्यालयातही तक्रार दिली आहे. मात्र, आरोपी शिक्षकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जर शाळेत शिक्षिकाच सुरक्षित नसतील तर तिथे शिकणारी मुले-मुली कशी सुरक्षित राहू शकतील, असे या शिक्षिकेचे म्हणणे आहे. तिने पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.
या महिला शिक्षिकेच्या तक्रारीनुसार २ एप्रिलची ही घटना आहे. तिथे आरोपी शिक्षकाने तिला बोट दाखवून अश्लिल इशारा केला. मी पहिल्यांदा त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतू दुसऱ्यांदा त्याने तसेच केले, ही बाब तिथल्या सहकारी शिक्षकांनीही पाहिली. शिक्षकांची बैठक सुरु होती, ती संपल्यावर तिने त्या शिक्षकाला पुन्हा असे न करण्यास बजावले. यावर तो भडकला आणि हात पकडून धमकी द्यायला लागला. यावेळी शाळेत आलेल्या एका गेस्टने ते पाहिले आणि मला त्याच्या तावडीतून सोडविले, असे या शिक्षिकेने म्हटले आहे.
या घटनेची तक्रार केल्यानंतर शाळा प्रशासनाने त्या शिक्षकावर कारवाई करण्याचे सोडून तिच्यावर हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकत आहे. शिक्षकाकडून तिला सतत धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी केली जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापक योगेश मीना यांनी सांगितले की, एका शिक्षिकेने शाळेतीलच एका शिक्षकावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. समितीने चौकशी करून अहवाल प्रादेशिक कार्यालय, जयपूरला पाठवला आहे.