Crime News: बँक लुटून पळत असलेल्या चोरांची बाईक वाटेत बिघडली, ढकलून नेताना सीसीटीव्हीमध्ये झाले कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 10:56 AM2021-10-13T10:56:45+5:302021-10-13T10:57:07+5:30
Crime News: गुजरातमधील बार्डोलीमध्ये दिवसाढवळ्या बँकेची लूट (Bank robbery) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन चोरांनी देशी कट्ट्यांचा धाक दाखवत दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम लांबवली.
सूरत - गुजरातमधील बार्डोलीमध्ये दिवसाढवळ्या बँकेची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन चोरांनी देशी कट्ट्यांचा धाक दाखवत दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम लांबवली. धक्कादायक बाब म्हणजे लूट केल्यानंतर पळून जात असलेल्या तिन्ही चोरांची मोटरसायकल बिघडली. मात्र हे चोर पैशांसह खराब मोटारसायकल घेऊनही फरार झाले. सध्या पोलिसांना या चोरीचा तपास सुरू केला आहे. याशिवाय लुटीच्या एका अन्य घटनेमध्ये चोरट्यांनी सूरतमध्ये एका बिल्डरला लक्ष्य केले. येथे चोरांनी ९० लाख रुपयांची लूट केली.
सूरत जिल्हा सहकारी बँकेच्या मोटागाव स्थित शाखेमध्ये तीन चोरट्यांनी हा दरोडा टाकला. आसपारच्या परिसरातील शांतता आणि बँकेतील कमी वर्दळ याचा अंदाज घेत हे चोर बँकेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. सीसीटीव्हीमध्ये हे चोर एका महिला कर्मचाऱ्यासह स्टाफमधील अनेक सदस्यांसोबत मारहाण करताना दिसत आहेत. चोरांच्या हातात देशी कट्टेही होते. या चोरट्यांनी लुटलेल्या रकमेचा आकडा १० लाख ४३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे चोर चेहरा लपवून दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीने येथे आले होते. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत. मीडिया रीपोर्ट्सनुसार चोरांनी सिक्युरिटी गार्डच्या अनुपस्थित हा दरोडा टाकला आहे.
बँक लुटल्यानंतर बाहेर पडलेले चोरटे १०० मीटर अंतरावर असलेल्या एका घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. सीसीटीव्हीमध्ये दोन चोर खराब बाईकला धक्के मारून नेतानाही दिसत आहेत. तर एक चोर लुटलेली रक्कम पोत्यात भरून घेऊन जाताना दिसत होता.