भाजपाला मत देणं महिलेला पडलं महागात; पतीने थेट नातं संपवण्याची दिली धमकी, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 02:06 PM2022-03-21T14:06:06+5:302022-03-21T14:07:43+5:30
Crime News : भाजपाला मत दिलं म्हणून पतीने ट्रिपल तलाकची धमकी दिल्याचा गंभीर आरोप बरेलीतील महिलेने केला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आता संपल्या आहेत. मात्र त्याचा परिणाम आता कुटुंबावर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाला मत देणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. पतीने थेट नातं संपवण्याची धमकी दिली आहे. भाजपाला मत दिलं म्हणून पतीने ट्रिपल तलाकची धमकी दिल्याचा गंभीर आरोप बरेलीतील मुस्लिम महिलेने केला आहे. या महिलेने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहीण फरहत नकवीकडे याबाबत तक्रार केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बरेली येथे राहणाऱ्या नजमा उलमाने विधानसभा निवडणुकीत भाजपाला मत दिलं म्हणून पतीने ट्रिपल तलाकची धमकी दिली आणि बेदम मारहाण करून घराबाहेर काढल्याचं म्हटलं आहे. तसेच तिने यावेळी अनेक महिलांनी गुपचूप भाजपाला मतदान केल्याचं देखील म्हटलं आहे. केंद्र सरकारने ट्रिपल तलाकबाबत आणलेल्या कायद्यामुळे भाजपाला मतदान केलं असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीच्या एजाज नगरमध्ये राहणाऱ्या नजमा उलमा अन्सारीने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात प्रेमविवाह केला होता.
2021 मध्ये नजमाचा निकाह झाला होता. नजमा उलमाने घरच्यांना आपण भाजपाला मत दिल्याचं सांगितलं. तेव्हा पती प्रचंड चिडला आणि त्याने तिला तलाकची धमकी देत मारहाण करायला सुरुवात केली. तसेच मला तलाक देण्यापासून भाजपा सरकार कसं अडवतं ते मी पाहतोच असं देखील म्हटलं आहे. पीडित महिलेने महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मेरा हक फाऊंडेशनच्या अध्यक्ष फरहत नकवी यांच्याकडे मदत मागितली आहे.
फरहत या केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या बहीण असून त्या मेरा हक फाऊंडेशन नावाने एक एनजीओ चालवतात. ट्रिपल तलाक पीडितांची मोठी मदत करतात. नजमा उलमाने फरहत यांची भेट घेऊन आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजू जाणून घेणार असल्याचं फरहत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.