तरुणीवर अॅसिड अटॅक करून फरार झाला; आश्रम गाठून साधू बनला; 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 03:20 PM2022-05-14T15:20:39+5:302022-05-14T15:22:23+5:30
Crime News : प्रेमाला नकार दिल्यानंतर त्याने एका मुलीवर अॅसिड हल्ला केला होता.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घ़डत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एका मुलीवर अॅसिड फेकल्याप्रकरणी आरोपीला थेट तामिळनाडूतील एका आश्रमातून अटक करण्यात आली आहे. या आश्रमात हा आरोपी साधूचा वेश धारण करुन राहत होता. नागेश असं आरोपीचं नाव आहे. मुलीवर अॅसिड हल्ला केल्यानंतर तो आरोपी फरार झाला होता. याच्या अटकेसाठी पोलिसांनी 7 पथके तयार केली होती.
प्रेमाला नकार दिल्यानंतर त्याने एका मुलीवर अॅसिड हल्ला केला होता. ही घटना 28 एप्रिलला कामाक्षीपाल्या परिसरात घडली. आरोपी नागेश एक कड्यांची कंपनी चालवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश हा त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता. मात्र, मुलीने त्याला नकार दिला. मुलीने त्याला दिलेल्या नकारानंतर संतापात त्याने त्याच मुलीवर अॅसिड हल्ला केला.
राज्य सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. यानंतर आरोपी नागेशला पकडण्यासाठी 7 वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आली होती. तर दुसरीकडे अटकेच्या भीतीने आरोपी नागेश हा तामिळनाडू जाऊन पोहोचला होता. तसेच वेल्लोर जवळच्या एका आश्रमात जाऊन तो लपला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्या आश्रमात त्याने साधूचाही वेश धारण केले होता. मात्र, अखेर पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान, अॅसिड हल्ला झालेल्या मुलीची तब्येत गंभीर आहे.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले की, पीडित मुलीच्या सर्व उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. तसेच तिला आर्थिक मदतही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. देशात याआधीही मुलींवर अॅसिड हल्ला केल्याची प्रकरणे समोर आली आहे. यात मुलीने प्रेमाला नकार दिल्यानंतर संतापात प्रेमीने मुलीवर अॅसिड हल्ला केला आहे. या घटना पाहता काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने उघड्यावर अॅसिड विक्रीवर बंदी घातली होती. असे असतानाही या आरोपींना अॅसिड सहज उपलब्ध होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.