क्रूरतेचा कळस! मंदिरात चोरी करण्यासाठी केली 7 कुत्र्यांची हत्या; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 16:10 IST2022-01-30T15:59:24+5:302022-01-30T16:10:11+5:30
Crime News : एका मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी तब्बल 7 कुत्र्यांची हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

क्रूरतेचा कळस! मंदिरात चोरी करण्यासाठी केली 7 कुत्र्यांची हत्या; परिसरात खळबळ
नवी दिल्ली - बिहारमधील भभुआमध्ये एक धक्कादायक घटना घ़डली आहे. एका मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी तब्बल 7 कुत्र्यांची हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. लोकांनीही मनस्ताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील भभुआ जिल्हा स्टेशन रोड येथे ही भयंकर घटना घडली आहे. भभुआ रोडच्या काही अंतरावर काली मातेचं जुनं मंदिर आहे. या मंदिराच्या दानपेटीवर काही लोकांची नजर होती. यापूर्वीही मंदिरातून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या दानपेटीवर समाजकंटकांची नजर होती. याशिवाय आजूबाजूच्या कुत्र्यांना मंदिरात जेवण दिलं जात होतं. कुत्रेदेखील मंदिराजवळ राहून राखण करीत होते. मंदिराची ग्रिल बंद होती, त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तर कुत्रे भुंकायला लागायचे. त्यामुळेच या भीतीने चोरांनी सर्व कुत्र्यांना जेवणात विष दिलं.
घटनेदरम्यान सात कुत्रे हजर होते. चोरांनी सर्व कुत्र्यांची हत्या केली. यानंतर दरवाजा तोडून दानपेटीमध्ये असलेले सर्व पैसे चोरी केले. या घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त केला. लोकांनी ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं सांगितलं. याशिवाय मृत कुत्र्यांचं पोस्टमार्टम करण्याची मागणी केली जात आहे. स्थानिकांनी चोरांच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.