बाबो! ख्रिसमससाठी 'तो' गर्लफ्रेंडला भेटायला गेला पण गावकऱ्यांनी धडा शिकवला; लावून दिलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 08:19 AM2021-12-28T08:19:30+5:302021-12-28T08:27:29+5:30
Crime News : ख्रिसमसच्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलाचं गावकऱ्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. ख्रिसमससाठी गर्लफ्रेंडला भेटायला जाणं एका मुलाला चांगलंच महागात पडलं आहे. गावकऱ्यांनी त्याला धडा शिकवला असून थेट त्याचं लग्न लावून दिलं. ख्रिसमसच्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलाचं गावकऱ्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत ओळख झाल्यानंतर मुलगा तिला भेटायला जात असे. मात्र गावकऱ्यांना ही बाब मान्य नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांनी भेटायला आलेल्या मुलाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील परशुरामपूर गावात एक अल्पवयीन मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पोहोचला. ते दोघंही एकाच वर्गात होते आणि एकाच कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होते. कोचिंग क्लासमध्येच दोघांची ओळख झाली होती आणि त्याचं रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झालं होतं. त्यानंतर हा मुलगा वरचेवर गावात येऊन गर्लफ्रेंडला भेटत असे आणि गप्पा मारत असे. मात्र गावकऱ्यांना ही बाब मान्य नव्हती आणि त्यांना दोघांचं अशा प्रकारे भेटणं आवडत नव्हतं.
सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल
ख्रिसमसच्या निमित्ताने गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या मुलाला गावकऱ्यांनी पकडलं आणि सर्व ग्रामस्थ एका ठिकाणी गोळा झाले. दोघांना गावातील मंदिरात नेण्यात आलं आणि तिथं त्यांचं जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. दोघंही अल्पवयीन आहेत, याचा विचारही ग्रामस्थांनी केला नाही. आपल्याला सोडून देण्याची विनंती मुलगा वारंवार करत राहिला, मात्र ग्रामस्थ काहीही ऐकायला तयार नव्हते. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ग्रामस्थांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
जबरदस्तीने अल्पवयीन मुलांचं लग्न लावून देण्याच्या ग्रामस्थांच्या कृत्याचा दोघांच्याही घरच्यांनी निषेध केला आहे. ग्रामस्थांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अल्पवयीन मुलांचं अपहरण करून जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. तर पोलीस अनेकांची कसून चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.