Crime News: झोलाछाप बोगस डॉक्टरचा प्रताप, ७५ वर्षांच्या वृद्धाला दिलं जनावरांचं इंजेक्शन, झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:10 PM2022-04-20T12:10:56+5:302022-04-20T12:11:48+5:30
Crime News: एका बोगस डॉक्टरने पाठदुकीने त्रस्त असलेल्या एका ७५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला जनावरांचं इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भुवनेश्वर - एका बोगस डॉक्टरने पाठदुकीने त्रस्त असलेल्या एका ७५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला जनावरांचं इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओदिशामधील मयूरभंज जिल्ह्यातील गौडियाबहली गावातील ७५ वर्षीय दैतारी मोहंता पाठदुखीने त्रस्त होते. एकेदिवशी क्योंझर जिल्ह्यातील कांतिपाल येथील रहिवासी असलेला आणि स्वत: डॉक्टर असल्याचा दावा करणारा विश्वनाथ बेहरा त्यांच्या घरी आला. त्याने भुवनेश्वर येथून औषध आणि इंजेक्शन आणल्याचे सांगितले. तसेच या औषधामुळे आणि इंजेक्शनमुळे त्वरित दिलासा मिळेल आणि दुखणे थांबेल, असा दावा त्याने केला. त्यामुळे दैतारी यांनी विश्वनाथकडून इंजेक्शन घेण्यास तयारी दर्शवली.
दैतारी मोहांता यांनी होकार देताच विश्वनाथ याने त्यांना एकापाठोपाठ एक अशी तीन इंजेक्शन दिली. यातील प्रत्येक इंजेक्शनची किंमत ५०० रुपये होती. तसेच तीन दिवसांपर्यंत सहा गोळ्या खाण्यास दिल्या. तसेच त्याची फी म्हणून ४०० रुपये घेतले. मात्र ही इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून मोहंता यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ताप येऊ लागला. त्याबरोबरच जुलाबही सुरू झाले. त्यानंतर मोहंता यांना त्यांच्या मुलाने त्वरित ठाकुरमुंडा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.
अगदी योग्य वेळी रुग्णालयात दाखल केल्याने मोहंता यांचे प्राण वाचले. तसेच त्यांना दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ३०७, ३३७ आणि ४१७ अन्वये गुन्हा दाखल केले आहे. सध्या हा बोगस डॉक्टर फरार आहे. दरम्यान, या डॉक्टरने याआधीही एका व्यक्तीला जनावरांचं इंजेक्शन दिलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.