आईवर लहानपणी झाला होता बलात्कार; लेकाने तब्बल 28 वर्षांनंतर 'असा' मिळवून दिला 'न्याय'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 02:07 PM2022-08-04T14:07:17+5:302022-08-04T17:29:32+5:30
Crime News : एका मुलाला आपल्याला पालकांनी दत्तक घेतलं हे समजलं. तेव्हा त्याने त्याच्या जन्माचं रहस्य शोधून काढलं आहे.
नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेवर ती लहान असताना बलात्कार झाला होता. पण आता तब्बल 28 वर्षांनी तिच्या लेकाने तिला न्याय मिळवून दिला आहे. एका मुलाला आपल्याला पालकांनी दत्तक घेतलं हे समजलं. तेव्हा त्याने त्याच्या जन्माचं रहस्य शोधून काढलं आहे. त्याने आपल्या खऱ्या आईचा शोध घेतला. त्याला आईसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. यानंतर तो आईसाठी लढला आणि तिला न्याय मिळवून दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1994 मध्ये ही घटना घडली आहे. त्यावेळी 12 वर्षांची मुलगी तिच्या बहिणीसोबत राहत होती. तिची बहीण एका खासगी शाळेत शिकवत होती. एके दिवशी वस्तीतील नकी हसन उर्फ ब्लेडी ड्रायव्हरने घरात घुसून मुलीवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी त्याचा दुसरा भाऊ मोहम्मद रझी उर्फ गुड्डू याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला, तो मुलगा हरदोई येथील एका जोडप्याला दिला गेला.
तब्बल 27 वर्षांनंतर मुलाला त्याच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल जाणून घ्यायचं होतं तेव्हा त्याला वाढवणाऱ्या व्यक्तीने त्याला त्याच्या आईचं नाव सांगितलं. त्यानंतर मुलाने आईला शोधून तिची भेट घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने त्याला तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. पीडितेने मुलाच्या सांगण्यावरून आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयाची मदत घेतली. 4 मार्च 2021 रोजी महिलेने न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
शहाजहानपूरचे एसएसपी एस. आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "खूप तपास केल्यानंतर दोन्ही आरोपींबाबत माहिती मिळाली. अनेक पथके तयार करण्यात आली. 48 वर्षीय मोहम्मद रझी हैदराबादमध्ये लपून बसला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचे लोकेशन ओडिशामध्ये सापडले आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.