लाउंजमध्ये प्रवेश नाकारल्याने बाउन्सरला भोसकले; APMC मधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:35 PM2022-06-08T12:35:49+5:302022-06-08T12:38:06+5:30
Crime News : एपीएमसी आवारातील सतरा प्लाझा इमारतीमधील हुक्का पार्लर व लाउंजमुळे त्याठिकाणी सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - लाउंजमध्ये प्रवेश नाकारल्याने ८ ते १० जणांच्या टोळीने बाउन्सरवर हल्ला करत चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एपीएमसीतील ऑरेंज मिंट लाउंजमध्ये हा प्रकार घडला. यामध्ये एक बाउन्सर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशीतल्या खासगी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे.
एपीएमसी आवारातील सतरा प्लाझा इमारतीमधील हुक्का पार्लर व लाउंजमुळे त्याठिकाणी सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत. तर सर्व नियम पायदळी तुडवून तिथल्या आस्थापना पहाटेपर्यंत सुरू ठेवल्या जात आहेत. यामुळे संबंधित सर्वच प्रशासनांकडून त्यांना अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याची शंका उपस्थित होत आहे. तर रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या लाउंजमुळे शहराच्या ठिकठिकाणातील गुन्हेगारांचा परिसरात वावर वाढत आहे. अशाच प्रकारातून शनिवारी मध्यरात्री ऑरेंज मिंट लाउंजमध्ये तुफान हाणामारी झाली.
कोपर खैरणे परिसरात राहणाऱ्या ८ ते १० जणांचा समूह रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी हुक्का पिण्यासाठी गेला होता. परंतु अगोदरच आतमध्ये गर्दी असल्याने व आलेल्यांपैकी काहीजण चप्पलवर असल्याने बाउन्सरने त्यांना अडवले. यावरून त्यांच्यात वाद झाला झाला. यातून तरुणांच्या जमावाने लाउंजच्या बाहेरचे टेबल व खुर्च्या मारून बाउंसरवर हल्ला केला. त्यातच जमावापैकी एकाने मनोज कदम या बाउंसरवर चाकूने हल्ला केला. हा वार त्याच्या पायावर लागल्याने गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर वाशीतल्या खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे.
घटनेमुळे सतरा प्लाझा इमारतीमधील पहाटे पर्यंत चालणारे हुक्का पार्लर व लाउंज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी त्याठिकाणी महिला सुरक्षा रक्षकांना मारहाण, ग्राहकांना डांबून ठेवणे, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांनाच बाहेर थांबवणे असे प्रकार घडले आहेत. यानंतरही त्याठिकाणी चालणारे गैरप्रकार नियंत्रणात येत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.