धक्कादायक! नुपूर शर्माचा Video पाहणाऱ्या तरुणावर 6 वेळा केला चाकूने वार अन्...; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:02 PM2022-07-19T12:02:41+5:302022-07-19T12:03:23+5:30
Crime News : नुपूर शर्माचा व्हिडीओ पाहिला म्हणून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - राजस्थानमधील उदयपूरसारखीच एक घटना आता बिहारच्या सीतामढीमधून समोर आली आहे. नुपूर शर्माचा व्हिडीओ पाहिला म्हणून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यातील जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला दरभंगा येथे रेफर करण्यात आलं. त्याला डीएमसीएच हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 2 आरोपी फरार आहेत. अंकित झा असं या तरुणाचं नाव आहे.
या हल्ल्यात जखमी झालेला तरुण अंकित झा हा नानपूरमधील बहेरा गावचा रहिवासी आहे. अंकितचे वडील मनोज झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा पान खाण्यासाठी दुकानात गेला होता. याच दरम्यान तो मोबाईलवर नुपूर शर्माचा व्हिडीओ पाहत होता. त्यानंतर मोहम्मद बिलाल त्याच्या तीन साथीदारांसह तिथे आला. अंकित नुपूर शर्माचा व्हिडीओ पाहात असल्याचं पाहून तो संतापला.
आरोपींनी अंकितला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विरोध केल्याने त्यांनी अंकितवर चाकूने वार केले. अंकितच्या शरीरावर चाकूच्या सहा जखमा आहेत. हीच गोष्ट आपण पोलिसांना सांगितल्याचे मनोज यांनी सांगितलं. अंकितनेही दरभंगा येथे उपचारादरम्यान असंच सांगितलं. मात्र, पोलिसांनी एफआयआरमध्ये नुपूर शर्माचं नाव वगळलं आहे. अंकितच्या वडिलांनी हल्लेखोरांच्या अटकेसोबतच कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी नानपूर गावातील गौरा येथील रहिवासी बिलाल आणि मोहम्मद निहालसह पाच जणांना आरोपी घोषित केलं आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जखमी तरुण लोकांच्या गर्दीत दिसत आहे. तिथे उभे असलेले लोक तरुणावर चाकूने हल्ला झाल्याचं बोलत आहेत. यासोबतच एक तरुण बाईक घेऊन तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, त्याला उपस्थित लोकांनी अडवलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मात्र वेगळंच कारण सांगितलं आहे.पुपरी डीएसपी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मित्र पान दुकानात पान खात होते, त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. पान दुकानातही भांगही विकली जात होती. याच दरम्यान चाकूने मारामारी सुरू झाली. या प्रकरणातील नुपूर शर्मा कनेक्शन नाकारताना डीएसपी म्हणाले की, हा दोन मित्रांमधील वाद आहे. जखमी तरुणाची प्रकृती सध्या स्थिर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.