"माझं तिच्यावर खूप प्रेम आहे पण लोक लग्न करू देणार नाहीत"; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 04:19 PM2022-06-18T16:19:24+5:302022-06-18T16:24:58+5:30
Crime News : प्रेमप्रकरणातून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या कोटा येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. "माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण आता ते लोकांना समजलं आहे. लोक मला तिच्याशी लग्न करू देणार नाहीत. म्हणूनच मी आत्महत्या करत आहे" असं तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुलतानपूरच्या नोताडा मालियन गावात ही घटना घडली आहे. परिसरातील एक 15 वर्षीय मुलगी घरातून अचानक गायब झाली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलीस मुलीचा शोध घेत असतानाच मुलगी घरी पोहोचली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं. गुरुवारी मुलीला कोटा बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं. मुलगी घरी आल्यानंतर गावातील कोणीतरी तिच्या कुटुंबीयांना मुलीला गावातील लोकेश प्रजापती (19) याच्या घरातून बाहेर पडताना पाहिल्याचे सांगितलं.
मुलीच्या घरातील लोक हे ऐकून संतापले. ते त्यांच्या नातेवाईकांसह गावातील लोकेशच्या घराबाहेर जमले. लोकेशला बाहेर बोलावण्याची मागणी करू लागले. गर्दी पाहून लोकेश घाबरला. त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. लोकेशच्या घराबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. लोकेशवर मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला. यानंतर पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना लोकेशबाबत विचारणा केली असता त्यांनी लोकेश घरी असल्याचे सांगितले.
लोकेश खोलीचा दरवाजा उघडत नव्हता. पोलिसांनी दरवाजा उघडला असता तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस अधिकारी संदीप विश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. यात त्याने "माझे तिच्यावर खूप प्रेम आहे, पण आता लोकांना ते समजलं आहे. लोक मला तिच्याशी लग्न करू देणार नाहीत, म्हणून मी आत्महत्या करत आहे" असं लिहिलं आहे. याप्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.