आजोबा झाले हैवान! 3 वर्षीय नातवाला फिरायला नेलं अन् नदीत फेकलं; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:03 PM2022-02-28T14:03:07+5:302022-02-28T14:05:39+5:30
Crime News : आजोबा हैवान झाले आणि त्यांनी थेट आपल्या चिमुकल्या नातवाचा जीव घेतला आहे.
नवी दिल्ली - बिहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. आजोबा हैवान झाले आणि त्यांनी थेट आपल्या चिमुकल्या नातवाचा जीव घेतला आहे. बिहारच्या बक्सरमध्ये 65 वर्षीय व्यक्ती आपल्या 3 वर्षांच्या नातवाला नदीत फेकून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजोबांनी सांगितल्यानंतर मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. ही घटना बिहारमधील सीताकुंड येथील आहे. हत्येमागे पैशांची देवाण-घेवाण असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी असलेला व्यक्ती नात्याने मुलाचा आजोबा लागतो. मृत चिमुकला आरोपीच्या पुतण्याचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरड्याचं नाव अंश केशरी आहे. तो कृष्णा केशरीचा मोठा मुलगा होता. कृष्णा केशरीकडून त्याचे काका संतोष केशरी (65 वर्षे) यांनी पैशांची मागणी केली होती. जे देण्यास त्याने नकार दिला होता. यानंतर संतोष केशरी शनिवारी सकाळी साधारण 11 वाजता अंशला फिरवायला बाहेर घेऊन गेले. यानंतर ते सायंकाळी घरी आले, मात्र अंश त्यांच्यासोबत आला नाही.
कुटुंबीयांनी विचारलं तरी त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. यानंतर कुटुंबीयांनी तपास सुरू केला. मात्र अंश तरीही सापडला नाही म्हणून त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर संतोष केशरीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यानंतर कसून चौकशी केल्यावर त्याने सत्य उघड केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष केशरीने जंगली बाबा शिवमंदिरजवळील सीता कुंडमध्ये बुडवून चिमुरड्याची हत्या केली. रविवारी नदीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
संतोष केशरीला या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष केशरीला 3 भाऊ आहेत. मोठा भाऊ शिपाई केशरी आणि छोटा भाऊ भगवान केशरी आहे. या भावांमध्ये जमिनीची वाटणी झाली आहे. संतोष केशरीला देखील एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलाची अशाप्रकारे हत्या झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.