Crime News: नाराज प्रेयसीसाठी बॉयफ्रेंड कार घेऊन आला; लोकांना वाटले अपहरण, दोघे मोमोज खाताना सापडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 07:27 PM2023-01-26T19:27:58+5:302023-01-26T19:28:33+5:30
एसएसपी अखिलेश चौरसिया यांनी वायरलेसवरून सर्व पोलीस ठाण्यांना वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे पोलिसही सतर्क झाले आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या.
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये सकाळी सकाळी सनसनी पसरली, एका तरुणीचे कारवाल्यांनी अपहरण केल्याची बाब कोणीतरी पसरवली आणि खळबळ उडाली. काही लोकांनी सांगितले की सकाळी सा़डे नऊच्या सुमारास एका तरुणीला काही लोकांनी कारमध्ये खेचले आणि पळवून घेऊन गेले. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसही कामाला लागले. परंतू, तपासावेळी पोलिसांना जे आढळले ते पाहून ते ही काही काळ थबकले होते.
एसएसपी अखिलेश चौरसिया यांनी वायरलेसवरून सर्व पोलीस ठाण्यांना वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे पोलिसही सतर्क झाले आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. इज्जत नगर पोलिसांनी घटनास्थळी जात चौकशी सुरु केली. यावेळी कोणते वाहन होते, रंग कोणता होता, मुलीने कोणता ड्रेस घातला होता आदी चौकशी सुरु झाली.
तिथे उपस्थित काहीजणांना त्यांना ऐकीव असलेली माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या रस्त्याने पुढे पाठलाग सुरु केला. तेव्हा वर्णन केलेली गाडी एका हॉटेलसमोर थांबलेली दिसली. तिथे ती तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड मस्त मजेत मोमोज खात होते.
पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता पिलीभीत जिल्ह्याच्या विलासपूरचा निवासी तरुण आणि भोजीपुरातील तरुणी यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मुलगा चाट स्टॉल चालवतो आणि मुलगी बी.एड. शिकत आहे. दोघांमध्ये कशावरून तरी दुरावा निर्माण झाला होता. तो तरुण आपल्या मित्रांसोबत कारने प्रेयसीची समजूत घालण्यासाठी आला होता. बाचाबाची झाल्यानंतर प्रेयसीला शंभर फुटी रोडवर त्यांनी कारमध्ये बसवले. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी पाहिल्यानंतर अपहरणाचा संशय आला आणि सारा प्रकार घडला. पोलिसांनी दोघांनाही समजावले आणि या अपहरण नाट्यावर पडदा पडला.