जुगारात पैसे हरला, कर्जबाजारी झाला; रेल्वे कर्मचाऱ्याने लोकांच्या पैशांवरच डल्ला मारला, झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:32 AM2022-01-05T11:32:18+5:302022-01-05T11:32:40+5:30
Crime News : स्वतःची चोरी लपवण्यासाठी त्याने दरोडा टाकल्याचा कट रचला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली - चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याने लोकांच्या पैशांवरच डल्ला मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे कर्मचारी ऑनलाईन जुगारात पैसे हरला आणि कर्जबाजारी झाला. हे कर्ज फेडण्यासाठी एका रेल्वे तिकीट काऊंटर क्लार्कने स्वतःच्याच काऊंटरवरचे पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वतःची चोरी लपवण्यासाठी त्याने दरोडा टाकल्याचा कट रचला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला आहे. चेन्नईतील तिरुवांम्यूर MRTS तिकीट काऊंटरवर प्रवाशांना तिकीटे देण्याचं काम करणाऱ्या टीकाराम नावाच्या तरुणाने स्वतःच्या पत्नीची मदत घेत दरोड्याचा बनाव रचला.
रेल्वे स्टेशनवर तिकीट काऊंटर साधारण पहाटे 4 वाजता किंवा त्यापूर्वी उघडण्यात येतं. घटनेच्या दिवशी मात्र 4.30 वाजले तरी तिकीट काऊंटर उघडण्यात आलं नव्हतं. त्यामुळे तिकीट काऊंटरसमोर प्रवाशांची मोठी रांग लागली होती आणि गोंधळ सुरू झाला होता. प्रवाशांचा गोंधळ ऐकून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तिकडे धाव घेतली असता तिकीट काऊंटर उघडलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काय घडलं हे पाहण्यासाठी पोलीस आतमध्ये गेले असता तिथं तिकीट विक्री कर्मचारी टीकारामचे हातपाय दोरीनं बांधण्यात आल्याचं पोलिसांना दिसलं. त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. एका खिडकीला त्याला बांधून घालण्यात आलं होतं.
रेल्वे कर्मचाऱ्याने लुटले काऊंटरवरचे पैसे अन् रचलं दरोड्याचं नाटक
पोलिसांनी त्याची सुटका केली आणि चौकशीसाठी त्याला पोलीस स्टेशनला नेलं. आपण तिकीट काऊंटर उघडण्यासाठी पावणे चारच्या सुमाराला आतमध्ये आलो असता आपल्या मागून तीन दरोडेखोर आले आणि बंदुकीचा धाक दाखवून आपल्या काऊंटरला असणारी 1 लाख 32 हजार रुपयांची रक्कम घेऊन पळून गेले असं सांगितलं. पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र त्या तिकीट काऊंटरच्या परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांना अडचणी येत होत्या. पोलिसांनी स्निफर डॉगच्या मदतीनंही तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिकडूनही काही धागेदोरे मिळत नव्हते.
असा झाला पर्दाफाश
आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजमधूनही काही लिंक मिळत नव्हत्या. अखेर पोलिसांना टीकारामवरच संशय आला आणि त्यांनी त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पत्नीची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच आपल्या पतीला बांधून घातलं आणि पैसे घेऊन गेल्याची कबुली तिने दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून लुटलेले 1 लाख 32 हजार रुपये त्यांच्याकडून जप्त केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.