Crime News: जामनेरनजीक बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, एकास अटक, प्रिंटरसह साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:06 AM2022-05-20T00:06:05+5:302022-05-20T00:06:34+5:30
Crime News: हिंगणा, ता. जामनेर येथील बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे.
जळगाव - हिंगणा, ता. जामनेर येथील बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे.
उमेश चुडामण राजपूत (२२, रा. हिंगणा, ता. जामनेर) असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हा गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पहूर बसस्थानक परिसरात फिरत होता. चौकशी केली असता त्याच्याकडे २०० रुपयांच्या तीन नोटा आढळून आल्या. त्यापैकी एक बनावट होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याला पोलीस ठाण्यात आणले असता. आपण बनावट नोटा तयार करीत असल्याची कबुली त्याने दिली.
यानंतर पोलिसांनी हिंगणा येथे जाऊन त्याचे घर गाठले. तिथे २०० रुपयांच्या २३ नोटा आणि त्यासाठी लागणारा कागद आणि ११ हजार रुपये किमतीचे प्रिंटर असे साहित्य आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम पहूर पोलीस ठाण्यात सुरु होते.