ट्रॅफिक सिग्नलच्या बॅटऱ्या चोरायचं 'हे' कपल; भंगारात विकून केली हजारोंची कमाई, 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:32 AM2022-02-17T11:32:44+5:302022-02-17T11:35:31+5:30
Crime News : दोघे पहाटे 4 ते 5 या वेळेत त्यांच्या स्कूटरवरून शहरात फिरायचे आणि ट्रॅफिक सिग्नलच्या बॅटऱ्या चोरायचे. स्कूटरचा नंबर सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये म्हणून मागचा दिवा बंद करून ठेवायचे.
नवी दिल्ली - बंगळूरूमधील एका जोडप्याने झटपट पैसे मिळवण्याच्या नादात चुकीचा मार्ग स्वीकारला आहे. थेट ट्रॅफिक सिग्नलच्या बॅटऱ्या चोरून भंगारात विकण्याचा धंदा सुरू केला. या जोडप्याला बंगळुरूच्या अशोकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 230 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. सिकंदर आणि नजमा अशी या पती-पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या चिक्कबानवरा भागातील रहिवासी असलेले सिकंदर आणि नजमा दोघेही काम करत होते, मात्र अधिक पैसे कमावण्याच्या हव्यासातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.
जोडप्याने बॅटऱ्या चोरण्यास सुरुवात केली. सिकंदर रात्रीच्या वेळी एका टाऊनशिपच्या परिसरात चहा विकण्याचा धंदा करत होता तर नजमा कापड कारखान्यात काम करते. सिकंदरने एके दिवशी एका ट्रॅफिक सिग्नलवर एक उघडा बॅटरी बॉक्स पाहिला, त्यानंतर त्यानं त्यातून बॅटरी काढून दशरहल्लीतील एका भंगार विक्रेत्याकडे नेली. त्या भंगार विक्रेत्याने बॅटरीच्या बदल्यात सिकंदरला दोन हजार रुपये देऊ केले. मग काय, सिकंदरने नजमासोबत ट्रॅफिक सिग्नलवरून बॅटरी चोरून भंगारात विकण्याचा धंदाच सुरू केला. हे दोघे पहाटे 4 ते 5 या वेळेत त्यांच्या स्कूटरवरून शहरात फिरायचे आणि ट्रॅफिक सिग्नलच्या बॅटऱ्या चोरायचे. स्कूटरचा नंबर सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये म्हणून मागचा दिवा बंद करून ठेवायचे.
ट्रॅफिक सिग्नलवरून बॅटरी चोरीचे 68 गुन्हे दाखल
बंगळुरूमधील विविध पोलीस स्टेशनमध्ये ट्रॅफिक सिग्नलवरून बॅटरी चोरीचे 68 गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस या चोरांच्या शोधात होते. अशोकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅटरी चोरीला गेल्यानंतर पोलीस निरीक्षक मल्लेश बोलेटीन यांनी या चोरांना पकडायचा चंगच बांधला आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणाहून बॅटरी चोरीला गेली त्या सर्व ठिकाणांना मल्लेश आणि त्यांच्या टीमने भेट दिली. शेकडो सिग्नल्सवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. त्यावेळी त्यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे 3 ते 5 या वेळेत एक जोडपे स्कूटरवरून संशयास्पदरित्या फिरत असल्याचं आढळलं. परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या स्कूटरचा क्रमांक स्पष्ट झाला नाही कारण त्यांनी स्कूटरचा टेल लॅम्प बंद केला होता. हे जोडपे गोरगुंटेपाल्याच्या दिशेनं गेल्याचं पोलीस पथकाच्या लक्षात आलं.
300 हून अधिक लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी
पोलीस निरीक्षक मल्लेश बोलेटिन यांनी आरटीओकडून या जोडप्याच्या स्कूटरसारख्या दिसणाऱ्या तब्बल 4 हजार स्कूटर्सची माहिती घेतली. 300 हून अधिक लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली. यानंतर काही दिवस त्यांच्या टीमनं गोरगुंटेपाल्या जंक्शनजवळ तळ ठोकला. अखेर 9 फेब्रुवारी 2022 रोजी या टीमला सिकंदर आणि नजमाला पकडण्यात यश आलं. सिकंदरचा गुन्हेगारी इतिहास असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला 2017 आणि 2018 मध्ये अप्परपेट आणि जेजे नगर पोलिसांनी दुचाकी चोरल्याप्रकरणी अटक केली होती. ट्रॅफिक सिग्नलवरून चोरलेल्या या बॅटऱ्या भंगार म्हणून विकल्या जातात आणि त्या नंतर चारचाकी आणि कारखान्यांमध्ये वापरल्या जातात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.