भयंकर! बेडवर मुलीचा तर पंख्याला लटकलेला वडिलांचा मृतदेह; घटनेने खळबळ, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:40 PM2022-03-24T12:40:37+5:302022-03-24T12:43:03+5:30
Crime News : दिल्लीतील मेट्रो विहार फेज 2 मध्ये ही घटना घडली असून मुलीची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. घरामध्ये बाप-लेकीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील मेट्रो विहार फेज 2 मध्ये ही घटना घडली असून मुलीची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत मृत व्यक्तीच्या पुतण्याने तक्रार दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय सुरेश हे घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले, तर त्यांची 10 वर्षीय मुलगी मानसीचा मृतदेह बेडवर पडलेला होता. हा प्रकार सुरेश यांचा पुतण्या रोहन याच्या लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आसपासच्या लोकांकडून कुटुंबाबाबत माहिती घेतली. सुरेश यांची मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी होती. सुरेश यांची पत्नी रमा देवी या सफाई कर्मचारी आहेत.
मुलीच्या आजारपणामुळे सुरेश यांनी नोकरी सोडून तिची देखभाल करण्याचा निर्णय घेतला. परंतु वैद्यकीय उपाचारानंतरही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यामुळे सुरेश यांनी आधी मुलीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या करून जीवन संपवलं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मुलीच्या शरीरावर कसल्याही खूना आढळलेल्या नाहीत.
सुरेश यांची मुलगी चार ते पाच वर्षांपूर्वी दुसऱ्या मजल्यावरून कोसळली होती. या घटनेत ती गंभीररित्या जखमी झाली आणि तेव्हापासून तिच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. मुलीच्या आजारपणामुळे सुरेश हे कायम चिंताग्रस्त असत. याच नैराश्यातून त्यांनी मुलीसह स्वत:चं जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.