Crime News: जमिनीच्या वादातून जीवघेणा संघर्ष, बेदम मारहाण करून महिलेची हत्या, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 07:32 PM2022-06-01T19:32:41+5:302022-06-01T19:33:09+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यातील बिलरियागंज पोलीस ठाणे हद्दीतील छीही गावामध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या जीवघेण्या संघर्षामध्ये एका महिलेची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. दरम्यान, या हाणामारीत अनेक जण जखमी झाले.
आझमगड - उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यातील बिलरियागंज पोलीस ठाणे हद्दीतील छीही गावामध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या जीवघेण्या संघर्षामध्ये एका महिलेची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. दरम्यान, या हाणामारीत अनेक जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर अटकेची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लरियागंज पोलीस ठाणे क्षेत्रातील छीही गावातील रहिवासी रवींद्र प्रसाद यांचा गावातील केदार नावाच्या व्यक्तीसोबत जमिनीवरून वाद सुरू होता. रवींद्र प्रसादने आपल्या शेतात नवीन घर बांधण्यासाठी पिलर उभे केले होते. बुधवारी सकाळी तो घरात भोजन करत होता. त्याचवेळी केदार आणि त्याचे सहकारी असलेले फौजदार, संतराज, जैतील हे आले, त्यांनी घरासाठी उभारलेले पिलर पाडण्यास सुरुवात केली.
त्यानंतर रवींद्र प्रसादने तिथे येऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हल्लेखोरांनी कथितपणे रवींद्रवर हल्ला केला. यादरम्यान, भांडण थांबवण्यासाठी घरातील महिलाही मध्ये पडल्या. तेव्हा हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या, सळ्या, भाले यांच्या मदतीने हल्ला केला. हल्लेखोरांनी रीना भारती नावाच्या एका महिलेला बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. तर रवींद्र प्रसाद, मेनी देवी, सिद्धार्थ, बालकिशून, राधेश्याम, राजेंद्र, हरेंद्र हे जखंमी झाले.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.