रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 05:07 PM2022-08-31T17:07:23+5:302022-08-31T17:09:24+5:30

मनमाड : रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा रिपोर्ट नातेवाइकांना बघण्यास न दिल्याने आणि योग्य उपचार केले जात नसल्याचा आरोप करत ...

Crime News Doctor brutally beaten by patient's relatives in Nashik | रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

मनमाड : रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा रिपोर्ट नातेवाइकांना बघण्यास न दिल्याने आणि योग्य उपचार केले जात नसल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी शहरातील डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.२८) रात्री साडेदहा वाजता घडली. छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉ. जितेंद्र सुरेश गांधी यांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये साहित्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेचे मनमाडमध्ये तीव्र पडसाद उमटले. शहरातील सर्व डॉक्टरांनी पोलीस स्थानकात जाऊन घटनेचा निषेध करीत मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्यांचे धरपकड सत्र सुरू केले आहे. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गांधी रुग्णालयाचे संचालक डॉ. जितेंद्र गांधी हे रात्री १० वाजेच्या सुमारास रुग्णालयात नेहमीप्रमाणे रुग्णांना तपासत होते. यावेळी पाच ते सहा तरुण रुग्णालयामध्ये घुसले. त्यांनी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आपले नातेवाईक अनुष्का गरुड या मुलीचे रिपोर्ट मागितले. मात्र रुग्णाला डिस्चार्ज दिल्याशिवाय रिपोर्ट मिळणार नाही असे सांगितले असता डॉक्टर आणि या तरुणांमध्ये बाचाबाची झाली. मात्र ही बाचाबाची पुढे हाणामारीत रूपांतरित झाली. डॉक्टरांना मारहाण सुरू झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेले इतर रुग्ण गोंधळून गेले. आरडाओरडा सुरू झाला. या हल्ल्यात डॉ. जितेंद्र सुरेश गांधी (वय ३३) यांना मुका मार लागला आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी रुग्णालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून संशयित आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले आहे, तर काही जणांच्या शोध सुरू आहे. दरम्यान, डॉक्टरावर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डॉक्टर संघटनेकडून निषेध

शहरातील डॉक्टरांच्या संघटनेने या हल्ल्याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, डॉक्टर संघटनेने पोलीस स्थानकात जाऊन हल्ल्याचा निषेध नोंदवला. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत इंडियन मेडिकल असोसिएशने प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गिते यांना निवेदन देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप कुलकर्णी, डॉ. सुनील बागरेचा, बालरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र राजपूत, डॉ. प्रताप गुजराथी, डॉ. अजय भन्साळी, डॉ. प्रताप पाटील, डॉ. शांताराम कातकडे, डॉ. नूतन पहाडे, डॉ संजय सांगळे, डॉ. सतीश चोरडिया, डॉ. हर्षल पारख, डॉ. वर्षा झाल्टे, डॉ. सुहास जाधव, डॉ. विकास चोरडिया, डॉ. अमोल गुजराथी, डॉ. मच्छिद्र हाके, डॉ. धीरज बरडीया, डॉ. अविनाश डघळे, डॉ. शशिकांत कातकडे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Crime News Doctor brutally beaten by patient's relatives in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.