लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट, पतीसह कुटुंब मृत्यूच्या दारात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 09:45 AM2022-03-03T09:45:42+5:302022-03-03T09:52:32+5:30
Crime News : लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवरीने सासरच्यांना विष दिलं. त्यानंतर ती घरातील सोन्याचे दागिने आणि काही पैसे घेऊन पसार झाली आहे. नववधू भयंकर कट रचून पतीसह त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या दारात पोहोचवलं आहे. सध्या या कुटुंबीयांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील कोटपूतली येथे ही भयावह घटना घ़डलीआहे. येथील कृष्णा टॉकीज परिसरातील पटवा गल्लीत राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलाचं 22 फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं. कोटपूतली येथील लक्ष्मी नारायण मंदिरात हे लग्न पार पडलं होतं. लग्न झाल्यानंतर नववधू पूजा आनंदानं पतीसोबत नांदायला गेली होती. पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी रात्री पूजाने सर्वांसाठी जेवण बनवलं. घरातील सर्वांना हे जेवण खाऊ घातलं. पण तिने स्वतः अन्नाचा एक कणही खाल्ला नाही. रात्री जेवण केल्यानंतर संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडलं.
घरातील सर्व दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन काढला पळ
नवरीने हिच संधी साधून घरातील सर्व दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळ काढला आहे. घरातील कोणताच सदस्य घराबाहेर दिसला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, पोलीसही हादरून गेले. यानंतर पोलिसांनी तातडीने कुटुंबातील सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवरीचं नाव आणि घराचा पत्ता चुकीचा असण्याची शक्यता
नवरदेवाचे वडील नंदू पटवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लग्न एका मध्यस्थाच्या माध्यमातून झालं होतं. त्याबदल्यात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला दीड लाख रुपये देण्यात आले होते. या प्रकरणी कोटपूतली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी नवरी पूजाची माहिती काढली जात आहे. तिचं नाव आणि घराचा पत्ता देखील चुकीचा असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली आहे. पोलीस सध्या लग्नात मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या इतर लोकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.