Crime News: मोठा भाऊ मुंबईत नोकरीला, गावी छोट्या भावाने वहिनीसोबत ठेवले अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या आईची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 02:58 PM2022-06-06T14:58:41+5:302022-06-06T14:59:12+5:30
Crime News: वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने छोट्या मुलग्याने आपल्या आईची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न दीर आणि वहिनीने केला. मात्र याची खबर मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोघांनाही अटक केली.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यामध्ये नात्यांना कलंकित करणारी एक घटना घडली आहे. येथे वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने छोट्या मुलग्याने आपल्या आईची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न दीर आणि वहिनीने केला. मात्र याची खबर मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. त्यामधून गळा दाबल्याने आणि डोक्यावर जखम झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी छोटा मुलगा आणि त्याच्या वहिनीची कसून चौकशी केली. तेव्हा या दोघांनीही वृद्ध महिलेची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
हसनापूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस अधिकारी योगेंद्र सिंह मलिक यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सुमारे १०च्या सुमारास ६० वर्षीय रामश्री हिचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. मृत महिलेचे नातेवाईक तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात होते. मात्र पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. त्यानंतर हत्येची धक्कादायक बाब उघडकीस आली.
मलिक यांनी सांगितले की, ग्रामस्थांकडे केलेल्या चौकशीमधून रामश्रीचा धाकटा मुलगा संतराम आणि मोठी सून कामिनी यांच्यावर संशय बळावला. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्यातील अनैतिक संबंधांची बाब उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी वृद्ध आईची हत्या केल्याचेही कबूल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सून कामिनी हिचा पती राजेंद्र सिंह मुंबईत नोकरी करतो. त्यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पती मुंबईत असल्याने कामिनी आणि संतराम यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ही बाब ग्रामस्थ आणि रामश्री यांना माहिती होती. वहिनी आणि दिरामधील या संबंधांना रामश्री विरोध करायची. त्यातून त्या तिघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. अखेरत त्यातूनच रामश्रीची हत्या झाली.