धक्कादायक! घरगुती कारणावरून मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या, स्वतः दिली पोलिसांना माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 03:03 PM2022-07-12T15:03:15+5:302022-07-12T15:09:17+5:30
Crime News : सिरसो येथील खंडूजीनाना नगरात राहत असलेले सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक उल्हासिंग चव्हाण यांना दोन मुले आहेत.
मूर्तिजापूर - ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो पुंडलिक नगर परिसरातील खंडूजीनाना नगरात चव्हाण कुटूंबातील घरगुती वाद विकोपाला जाऊन मोठ्या भावाने लहान भावाची कोयत्याने हत्या केल्याची घटना १२ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान घडली.
सिरसो येथील खंडूजीनाना नगरात राहत असलेले सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक उल्हासिंग चव्हाण यांना दोन मुले आहेत. लहान मुलाला दारुचे व्यसन असल्याने तो आई - वडील व मोठय़ा भावाकडे दारुसाठी नेहमी पैशाची मागणी करीत असे, घटनेच्या वेळी लहान मुलगा रणधीर उल्हासिंग चव्हाण (३६) हा घरी दारु पिऊन आला व आईवडिलांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर चाकूने हल्ला केला, या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली. यावेळी घरात असलेला मोठा मुलगा प्रितम उल्हासिंग चव्हाण हा धावून आला असता त्याच्यावरही रणधीर याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
बचावासाठी बाजूला असलेल्या कोयत्याने प्रितमने प्रतिहल्ला केला त्यात रणधीरचा घटनास्थळी मृत्यू झाला. या संदर्भात ग्रामीण पोलीसांनी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी प्रितम याला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, माना पोलीस स्टेशनचे कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, घनश्याम पाटील यांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली.
स्वतः दिली पोलिसांना माहिती
घटना घडल्यावर आरोपी प्रितम उल्हासिंग चव्हाण याने त्याच्या हातून अशा प्रकारचे कृत्य घडल्याची माहीती जिल्हा पोलीस मुख्यालयात फोन करुन दिल्याने ताबडतोब पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला.
आई-वडिलावर हल्ला प्रितमच्या जिव्हारी
रणधीरने दारुसाठी आई वडिलांना पैशाची मागणी केली. पैसे न दिल्याने त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. ही बाब घरात उपस्थित असलेल्या प्रितमच्या जिव्हारी लागली रणधीरचा हल्ला परतून लावण्यासाठी प्रितमने जवळ बाजूला असलेला कोयता हातात घेतला, परंतु तो ऐकायला तयार नसल्याने प्रितमने हातातील कोयत्याने प्रतिहल्ला केला. तो वार एवढा जबरदस्त होता की, वार अडवायसाठी हात वर केला तेव्हा त्याचा मनगटापासून हात कटून गळ्याजवळ जोरदार वार झाला, त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.