'इंजिनीअर डे'च्या दिवशीच इंजिनीअरच्या कारनाम्याचा पर्दाफाश; बनावट आधारकार्डद्वारे कंपन्यांना गंडा
By प्रशांत माने | Published: September 15, 2022 05:04 PM2022-09-15T17:04:21+5:302022-09-15T17:10:45+5:30
२२ मोबाईल, १ लॅपटॉप, १ आयपॅड, १ टॅब, २० सिमकार्ड आणि २९ बनावट आधारकार्ड असा ५ लाख ८५ हजार १३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डोंबिवली - बनावट आधारकार्डद्वारे एमेझॉन व फ्लिपकार्ट कंपनीला गंडा घालून त्यांची फसवणूक करणाऱ्या उच्च शिक्षित इंजिनीअर व त्याच्या साथीदारांना मानपाडा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २२ मोबाईल, १ लॅपटॉप, १ आयपॅड, १ टॅब, २० सिमकार्ड आणि २९ बनावट आधारकार्ड असा ५ लाख ८५ हजार १३६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रॉबीन आरूजा (वय २८), किरण बनसोडे (वय २६), रॉकी कर्ण (वय २२), नवीनसिंग सिंग (वय २२), अलोक यादव (वय २०) अशी अटक पाच आरोपींची नावे आहेत. हे सर्व कल्याण, डोंबिवली आणि दिवा शीळ येथील राहणारे आहेत. आरोपींनी गुजरात, कलकत्ता राज्यातील विविध शहरात तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सातारा, ठाणे, अलिबाग शहरात संबंधित गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहीती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. हे सर्व सराईत गुन्हेगार असून यापुर्वी कराड, अलिबाग, कासारवडवली पोलिस ठाण्यात अशा प्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. दरम्यान गुरूवारी इंजिनिअर डे सर्वत्र साजरा होत असताना या गुन्ह्यातील म्होरक्या असलेल्या इंजिनिअर आणि त्याच्या साथीदार टोळीचा कारनाम्याचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल तारमळे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
अशी होती त्यांच्या गुन्ह्याची पद्धत
रॉबीन हा एमटेक इंजिनीअर आहे. रॉकी हा कॉलसेंटरमध्ये नोकरी करतो. तर अलोक सिमकार्ड विक्रेता आहे. आरोपी हे गुगलवरून ओळख नसलेल्या लोकांचे आधारकार्ड डाऊनलोड करायचे. त्या आधारकार्डवरूल मूळ व्यक्तीचा फोटो एडीटर अॅपवरून क्रॉप करून त्याठिकाणी आरोपी हे त्यांचा फोटो लावायचे. सिमकार्ड विक्रेता असलेला आरोपी अलोक याच्याकडून संबंधित आधारकार्डच्या आधारे सिमकार्ड खरेदी करायचे. सिमकार्डचे मोबाईल नंबरवरून अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या कंपन्यांकडून ऑनलाईन मोबाईल, टॅब, आयपॅड, लॅपटॉप अशा वस्तू ऑर्डर करायचे. कंपनीचा डिलिव्हरी बॉय संबंधित वस्तू देण्यास आल्यावर त्याच्याकडून वस्तूचा बॉक्स ताब्यात घेवून त्या बॉक्सला कटरने कापून त्यातील वस्तू काढून घेवून त्याठिकाणी त्या वजनाचा दगड, कपडा पॅक करून, पैसे कमी असल्याचे कारणावरून नंतर पैसे देतो असे कारण सांगून वस्तूचा बॉक्स डिलीव्हरी बॉयला परत करून तो कंपनीस परत पाठविण्यास सांगितले जायचे. डिलिव्हरी बॉयकडून प्राप्त मोबाईल व इतर वस्तू कमी किमतीत बाजारात विकली जायची. अशी आरोपींच्या गुन्ह्याची पद्धत होती.