दिल्लीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 1 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक, 6 मुलींसह 12 जणांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:46 PM2022-11-09T12:46:40+5:302022-11-09T12:48:00+5:30
crime news : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटरमध्ये प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली : सहज कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. द्वारका जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी 6 मुलींसह 12 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट कॉल सेंटरमध्ये लोकांना टार्गेट करून फसवणुकीची घटना घडली. आतापर्यंत 1700 हून अधिक लोकांना सुलभ कर्ज मिळवून देण्यावरून लक्ष्य करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ऑपरेशन टीमला माहिती मिळाली होती. बिंदापूर पोलिसांसह ऑपरेशन सेलच्या टीमने उत्तम नगर येथील बाल उद्यान रोडवर छापा टाकून या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. डीसीपी द्वारका एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आमिर, रोहित वर्मा, फैजल, विशाल, मोहित कुमार, संतोष, निधी, मेघा, अंशू, श्वेता, उषा आणि अर्चना यांचा समावेश आहे. हे सर्व गाझियाबाद आणि दिल्लीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 21 मोबाईल, 29 रजिस्टर, दोन नोटपॅड आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.
कॉल सेंटर ऑपरेटर फैजल आहे, तो उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवाशी आहे. औषध विकणे आणि औषधांचा प्रचार करणे, हे त्यांचे काम असल्याचेही फैजल याने टीमला सांगितले होते, असे डीसीपी द्वारका एम हर्षवर्धन म्हणाले. तसेच, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी फैजल काही वेगवेगळ्या कंपन्यांची औषधे काउंटरवर ठेवत असे. त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना तो कस्टमर सपोर्ट एजंट म्हणून दाखवत होता. अशा प्रकारे तो कर्ज मिळवून देण्याचे नाटक करून लोकांना फसवत असे, असेही डीसीपी द्वारका एम हर्षवर्धन यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटरमध्ये प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फैजलचा आणखी एक मित्र पारस याचा शोध सुरू असून तो मूळचा गाझियाबाद येथील आहे. पोलिसांना मिळालेल्या 29 रजिस्टरच्या आधारे आतापर्यंत कॉल सेंटरच्या माध्यमातून एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.