संतापजनक! हुंड्यासाठी पती झाला हैवान; सासू-सासऱ्यांचा टोमण्यांना कंटाळून महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 08:25 PM2021-12-06T20:25:22+5:302021-12-06T20:27:29+5:30
Crime News : सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे.
नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर पती हैवान झाला असून सासरच्या मंडळींचं भयंकर रुप समोर आलं आहे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुशिक्षित कुटुंबातील महिलेने हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये हरियाणाच्या सोहना राम मंदिर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचं ललिता नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली आहे. त्यांना दीड वर्षांचा मुलगादेखील आहे. ललिता उच्चशिक्षित होती आणि आर्किटेक्ट होती. मात्र तिला नोकरी मिळाली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून ललिताला हुंड्यावरून घरामध्ये सतत टोमणे मारले जात होते. तिची नणंद आणि सासूकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने पंचायतीत तक्रारही केली होती.
परिस्थितीला कंटाळून तिने आयुष्य संपवण्याचा घेतला निर्णय
पंचायतीत सासरच्या मंडळींना समज देण्यात आली होती आणि सूनेला हुंड्यासाठी त्रास न देण्याची ताकीदही देण्यात आली होती. मात्र तरीही आपल्या वर्तनात कुठलीही सुधारणा न झालेल्या मंडळींनी सुनेला टोमणे मारणं आणि तिच्याकडं हुंड्यासाठी तगादा लावणं सुरूच ठेवलं होतं. ललिताने आपल्याला होणाऱ्या त्रासाची माहिती आईवडिलांनाही दिली होती. पंचायत आणि आईवडील या दोन्ही ठिकाणी सांगून देखील टोमणे थांबत नव्हते आणि छळ संपत नव्हता. या परिस्थितीला कंटाळून तिनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
ललिताच्या वडिलांनी हुंडाबळीची नोंदवली तक्रार
राहत्या घरी गळफास घेऊन तिनं आपलं आय़ुष्य संपवलं. दुसऱ्या दिवशी सून दार उघडत नसल्याचं लक्षात आल्यावर घरच्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा पंख्याला लटकलेला ललिताचा मृतदेह आढळला. ललिताच्या वडिलांनी हुंडाबळीची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी घरच्यांकडे चौकशी सुरू केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.