सावकाराची मुजोरी! 3.5 लाख कर्ज घेतलं पण व्याज लावून केले 2 कोटी; शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:36 PM2022-06-16T12:36:01+5:302022-06-16T12:47:22+5:30
Crime News : सावकाराकडून साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते सतत फेडत असतानाही सावकाराने इच्छेनुसार चक्रवाढ व्याज आकारून ही कर्जाची रक्कम वाढवून 2 कोटी केली.
नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. करौली जिल्ह्यातील नादौती भागात एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की त्याने 10 ते 12 वर्षांपूर्वी सावकाराकडून साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते सतत फेडत असतानाही सावकाराने इच्छेनुसार चक्रवाढ व्याज आकारून ही कर्जाची रक्कम वाढवून 2 कोटी केली. यालाच कंटाळून शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून शेतकऱ्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नादौती पोलीस स्टेशन हद्दीतील सोप गावातील आहे. शेतकरी कमलराम मीना यांनी बुधवारी घराजवळील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या माहितीमुळे कमलराम यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना य़ाबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शेतकरी कमलराम मीना यांचा मुलगा हरिचरण याने दिलेल्या माहितीनुसार, 10-12 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी भरोसीलाल मीना ऑपरेटरकडून 3.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्ज हप्त्यांमध्ये फेडण्यात आले. शेतात जे काही पीक आले, ते देत राहिले. हरिचरण यांचा आरोप आहे की, भरोसीलालने बनावट पद्धतीने व्याजदर लादून ते तब्बल दोन कोटींपर्यंत पोहोचवलं. कर्ज फेडण्यासाठी तो वडिलांचा सतत छळ करत होता.
भरोसीलालने काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी येऊन वडिलांना शिवीगाळ केली. कर्ज फेडण्यासाठी त्यांचे वडीलही काही जमीन त्यांच्या नावावर द्यायला तयार होते. हरिचरणचा गंभीर आरोप आहे की सावकाराला संपूर्ण जमीन आणि त्याचे घर घ्यायचे होते. संपूर्ण जमीन आपल्या नावावर करण्यासाठी त्याने वडिलांवर दबाव आणला. याला कंटाळून वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.
सावकारासह तिघांवर गुन्हा दाखल
मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी सावकार भरोसीलाल आणि त्याचे दोन सहकारी हेमराज आणि हरकेश यांच्या विरोधात नादौती पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. हेमराज आणि हरकेशवर जबरदस्तीने शेतकऱ्याच्या शेतात नांगरणी केल्याचा आरोप आहे. शेतकरी कमलराम मीना यांनी ग्रामीण गायकांमध्ये गायक म्हणूनही काम केलं आहे. स्थानिक भाषेत याला मेडिया म्हणतात. शेतकऱ्याला दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांचा एक मुलगा रेल्वेत नोकरी करतो. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.