भयंकर! 14 वर्षे अंथरुणाला खिळलेल्या मुलाचा वडिलांनी घेतला जीव; अंगावर काटा आणणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:12 PM2022-01-10T20:12:07+5:302022-01-10T20:14:46+5:30
Crime News : अंथरुणाला खिळलेल्या मुलाचा वडिलांनी जीव घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अंथरुणाला खिळलेल्या मुलाचा वडिलांनी जीव घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी पित्याने दारूच्या नशेत मुलाला बेदम केली आहे. ही मारहाण इतकी भयावह होती की, यामध्ये मुलगा बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलाच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परमजीत असं मुलाचं नाव असून गेल्या चौदा वर्षांपासून त्याला अर्धांगवायूचा (पॅरालिसीस) आजार होता. त्यामुळे तो अनेक वर्षांपासून अंथरुणालाच खिळलेला आहे. अशात परमजीतच्या वडिलांनी 8 जानेवारी रोजी रात्री दारू पिऊन घरी येत, परमजीतला काठीने बेदम मारहाण केली आहे. यावेळी परमजीत याची बहीण देखील घरी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी बहीण घरी आली असता, तिला परमजीत अंथरूणात जखमी अवस्थेत दिसला.
बहिणीने 9 जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास भावाला भारत नगर येथील दीप चंद बंधू रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी परमजीत याची प्राथमिक तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परमजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीजेआरएम रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी परमजीतच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भारत नगर पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरुद्ध आयपीसी कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत वडिलांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास भारत नगर पोलीस करत आहेत. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.